Post Office News | भारतीय टपाल खात्याने (Indian Post Office) आधुनिकतेचा मंत्र जपत कात टाकली आहे. पोस्टाने टपाल कामांव्यतिरिक्त बँकिंग आणि वित्तीय सेवा(Banking And Financial Services) आणि आता तर आधार कार्ड दुरुस्तीचे काम ही सरकारकडून मिळवले आहे. त्यामुळे टपाल कार्यालय देशातील सेवा क्षेत्रात सरकारची एजन्सी म्हणून भरीव योगदान देत आहे. नवीन उत्पादने जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी टपाल खात्याने तंत्रज्ञानाची (Technology) कास धरली आहे. आता देशभरात नवीन 10 हजार पोस्ट कार्यालये सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पोस्टाचे जाळे मजबूत होणार आहे. पोस्टाच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने 52 हजार रुपयांचा निधी दिला आहे. सरकार डिलिव्हरी सिस्टीम मजबूत करण्यावर भर देत आहे. एवढेच नाहीतर येत्या काही दिवसात पोस्ट कार्यालय ड्रोनच्या माध्यमातूनही वस्तू घरपोच पोहचवतील.
टपाल विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी भारतीय प्रतिस्पर्धा संमेलनात पोस्ट कार्यालयाच्या आधुनिकीकरणावर विचार मांडले. गुजरातमध्ये ड्रोनच्या सहायाने डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती दिली. एवढेच नाही तर सरकारने माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्प तेजीने पुढे नेण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे घरपोच सेवांसाठी आधुनिक मार्गाचा वापर करण्यात येणार आहे.
सचिव शर्मा यांनी आगामी काळात टपाल खाते आणि सेवांचा विस्तार करण्यावर सरकार भर देणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार आता देशभर आणखी 10,000 कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांना घरपोच सेवा सुविधा देण्याचा सरकारचा विचार आहे. 10,000 कार्यालय सुरु करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.
देशात पोस्टाचे जाळे विणण्याचे काम सुरु आहे. पाच किलोमीटरच्या परिघात एक पोस्ट ऑफिस अथवा सेवा केंद्र उभारणीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठीच 10,000 कार्यालय सुरु करण्याचा हा प्रयोग राबवण्यात येत आहे. या आर्थिक वर्षात हे कार्यालय कार्यान्वित होतील. त्यामुळे आता देशातील एकूण पोस्ट कार्यालयांची संख्या 1.7 लाख होतील. ग्रामीण आणि दुरच्या ठिकाणी ही कार्यालये असतील.
टपाल सेवे व्यतिरिक्त पोस्ट कार्यालये बचत योजना ही चालवते आणि त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यात घोटाळा होण्याची वा बुडण्याची शक्यता नसल्याने आजही भारतीयांचा टपाल खात्यावर मोठा विश्वास आहे. बचत खाते, किसान विकास पत्र आणि आवर्ती बचत ठेव योजना टपाल खात्यामार्फत चालवण्यात येतात. एवढेच नाही तर टपाल जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा यासह इतर ही अनेक सेवा देण्यात येतात.