नवी दिल्ली : भारतीय रुपयाने (Rupee) डॉलरच्या दांडगाईला कृतीतून उत्तर दिले आहे. भारतीय रुपयात आता जागतिक व्यापार होत आहे. अनेक देशांनी भारतीय रुपयात व्यवहार आणि व्यापार करण्यास मंजूरी दिली आहे. रुपयातून दुसऱ्या देशात व्यापार करता यावा यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आघाडी घेतली आहे. त्यासाठी वोस्ट्रो खाते उघडण्यात येत आहे. जवळपास 18 देशांनी 60 खास रुपया वोस्ट्रो खाते (Vostro Account) उघडण्यात आले आहेत. या देशांसोबतच आता इतर अनेक मोठ्या देशांनी पण व्यवहारासाठी रुपयाला पसंती दिली आहे. या यादीत आता आणखी काही देशांचा समावेश झाला आहे. यापूर्वी हा व्यापार डॉलरमध्ये (Dollar) होत होता. पण आता दोन्ही देशातील व्यापार भारतीय रुपयात होत आहे.
मलेशियाने दिली मंजूरी
भारत आणि मलेशिया यांच्यात घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशात उच्चस्तरीय शिखर संमेलन झाले आहे. आशियातील घडामोडीत या दोन्ही देशाचं मोठं योगदान आहे. दोन्ही देशांमध्ये चांगले व्यापारी संबंध आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, दोन्ही देशातील व्यापार आणि व्यवहार आता इतर चलनाव्यतरिक्त रुपयात होणार आहे.
वोस्ट्रो खाते
केंद्रीय बँकेने घरगुती आणि परदेशी बँकांनी रुपयात व्यापारासाठी 60 खास रुपया वोस्ट्रो खाते (SRVA) उघडण्यास मंजूरी दिली आहे. पीटीआयने विषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 49 देशांनी भारतीय रुपयात व्यवहार करण्यासाठी खाते उघडली आहेत. तर इतर अनेक देशांना परवानगीची प्रतिक्षा आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे. या खात्यांचा उद्देश रुपयाच्या माध्यमातून परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
या देशांचा समावेश
भारतात एसआरव्हीए खाते उघडणाऱ्या देशांमध्ये जर्मनी, इस्त्राईल, युनायटेड किंगडम, रशिया, सिंगापूर, श्रीलंका, बोत्सवाना, फिजी, गुयाना, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, ओमान, सेशेल्से, टंझानिया, युगांडा यांचा समावेश आहे. या यादीत अजून अनेक मोठ्या देशांचा समावेश होणार आहे. हा आकडा लवकरच 70 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.
वाणिज्य सचिवांचा विश्वास
डॉलरच्या तुलनेत रुपयातील व्यवहार काही दिवसांपासून वाढला आहे. भारताने यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. ज्या देशात डॉलरचे भांडार घटले आहे, तसेच डॉलरमध्ये व्यवहार करताना त्यांना महागाईची झळ पोहचत आहे, असे देश सध्या भारताच्या रुपयात व्यवहार करण्यास प्राधान्य देत असल्याची माहिती वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिली आहे.