नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून ती वेगाने वाढत असल्याचे सीईएचे (CEA) मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वर यांनी म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था 2026-27 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरचा टप्पा पार करेल, तसेच आर्थिक वर्ष 2033-34 पर्यंत ती दहा लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याचे नागेश्वर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरचा टप्पा पार करेल असे म्हटले होते. मात्र सध्या तरी हे लक्ष्य 2024-25 पर्यंत शक्य नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनामुळे (Covid) भारतीय अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा फटका बसला आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोना काळातील सर्व निर्बंध उठवण्यात आले असून, अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणात होत आहे. त्यामुळे आपण 2026-27 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरचा टप्पा पार करू, असे व्ही. अनंत नागेश्वर यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना व्ही. अनंत नागेश्वर यांनी म्हटले आहे की, सध्या भारताची अर्थव्यवस्था ही 3.3 लाख कोटी डॉलरच्या स्थरावर आहे. अशा स्थितीत आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले 5 लाख कोटी डॉलरचे लक्ष्य साध्य करणे अशक्य नाही. भारती अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरच्या पातळीवर पोहोचेल, तर आर्थिक वर्ष 2033-34 पर्यंत त्यामध्ये दुप्पट वाढ होऊन अर्थव्यवस्था दहा लाख कोटी डॉलरच्या पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरच्या पातळीवर पोहोचवण्याचे लक्ष्य मोदींनी ठेवले होते. मात्र कोरोनामुळे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एक ते दोन वर्षांचा विलंब लागू शकतो, असे देखील सीईएने म्हटले आहे.
कोरोनापूर्व काळात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. मत्र दोन वर्ष जगासह देशात कोरोना संकट होते. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-व्यवहार ठप्प झाले. अनेकांनी आपले रोजगार गमावले. याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तसेच सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. महागाई जीडीपी वाढीच्या मार्गातील मोठा अडथळा ठरत असून, महागाईमुळे आर्थिक वृद्ध दराला फटका बसत असल्याचे देखील व्ही. अनंत नागेश्वर यांनी म्हटले आहे.