भारतीय ग्रोथ इंजिन गेल्या काही वर्षांपासून सुसाट आहे. अनेकांचे अंदाज चुकवत भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी कामगिरी बजावली आहे. जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने 10 व्या क्रमांकावरुन 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यंदा पुन्हा युरोपसह अमेरिकेत मंदीचे वारे वाहत आहेत. जगावर दोन युद्धाचा भार आहे. त्यातच आता भारतीय अर्थव्यवस्थेच्या या वेगाला ब्रेक लागण्याचे वृत्त येऊन धडकले आहे. गेल्या काही वर्षाप्रमाणे यंदा पण अर्थव्यवस्था जगाचा अंदाज चुकवणार का? रेटिंग एजन्सीना चकमा देणार का?
Goldman Sachs चा अंदाज काय
जागतिक संस्था गोल्डमन सॅक्सने भारतीय वृद्धी दराविषयी एक अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार वृद्धी दरात घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, गोल्डमन सॅक्सने सरकारच्या खर्चाच्या आधारे हा अंदाज लावला आहे. त्यानुसार वृद्धी दरात 20 आधार अंकांची कपात केली आहे. संस्थेच्या आधारे अर्थव्यवस्था या वर्षात, 2024 मध्ये 6.7 टक्के आणि 2025 मध्ये 6.4 टक्के दराने वाढू शकते.
वार्षिक आधारावर चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत सरकारी खर्चात 35 टक्क्यांची कमी येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था वृद्धी दरावर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक संस्थांचा अंदाज काही असला तरी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी जीडीपी वृद्धी दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
प्रत्येक तिमाहीसाठी काय अंदाज
जूनमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी पतधोरण समितीने जीडीपीविषयी अंदाज वर्तवला होता. केंद्रीय बँकेने 2024-25 साठी हा अंदाज 7.2 टक्के असेल असे जाहीर केले होते. पहिल्या तिमाहीसाठी हा अंदाज 7.1 टक्का, दुसऱ्या तिमाहीसाठी 7.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीसाठी 7.3 तर चौथ्या तिमाहीसाठी हा अंदाज 7.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी जागतिक पतमानांकन संस्थांनी भारताचा वृद्धी दर कमी वर्तवला होता. पण भारतीय अर्थव्यवस्थेने कमाल दाखवली होती. यंदा पण रेटिंग संस्थांचे अंदाज सपशेल चुकवत भारतीय अर्थव्यवस्था गरुड भरारी घेणार का? याकडे अर्थतज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.