नवी दिल्लीः रेल्वे प्रवासात विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे अतिरिक्त सामान (EXTRA LUGGAGE) बाळगळ्यास शुल्क आकारण्याचा निर्णयाचं वृत्त समोर आलं होतं. नव्या नियमामुळं खिशावर पडणाऱ्या अतिरिक्त बोजामुळं प्रवाशांच्या गोटात नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, भारतीय रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सामान बाबतचे वृत्त तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. रेल्वे प्रशासनानं (RAILWAY AUTHORITY) 10 वर्षापूर्वी प्रवाशांच्या सामानाबाबत धोरण निश्चित केलं आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे निर्धारित सामानाची मर्यादा सर्व प्रवाशांवर कायम असल्याचे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय रेल्वे मार्फत प्रवासादरम्यान विशिष्ट मर्यादेचं साहित्य निशुल्क सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. मात्र, त्याहून अधिक साहित्य बाळगल्यास विशिष्ट प्रकारचे शुल्क (EXTRA LUGAGE CHARGE) आकारले जाते.
रेल्वे मंत्रालयाच्या 29 मेच्या ट्विटनंतर प्रतिक्रिया उमटल्या होतात. प्रवाशांना विशिष्ट मर्यादेत सामान बाळगण्याचं आवाहन ट्विटद्वारे करण्यात आले होते. माध्यमात प्रवाशांनी अतिरिक्त सामान बाळगल्यास दंडाचा भुर्दंड सहन करावा लागेल अशाप्रकारचे वृत्त दिले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं होतं.
भारतीय रेल्वेनं सामान, साहित्य प्रवासात बाळगण्याबाबत विशिष्ट प्रकारची नियमावली आखली आहे. प्रवाशांना प्रवास करत असलेल्या कंम्पार्टमेंट नुसार सामानाची निश्चिती होती. खालील मर्यादेपर्यंत रेल्वे प्रवासात सामानावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
· सेकंड क्लास 35 किलो
· स्लीपर 40 किलो
· थर्ड एसी/चेअर-कार – 40 किलो
· फर्स्ट क्लास(नॉन-एसी)- 50 किलो
· फर्स्ट क्लास (एसी)- 70 किलो
· रुग्ण तसेच दिव्यांग संबंधित वैद्यकीय उपकरणांवर सूट
रेल्वेत प्रवाशांच्या जिविताला हानीकारक ठरणारं साहित्य बाळगण्यावर कायद्यानं बंदी आहे. रेल्वेनं विशिष्ट कायद्याची निर्मिती यासाठी केली आहे. स्टोव्ह, गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायन, फटाके याप्रकारचे सामान बाळगण्यावर कायद्यानं बंदी आहे. अन्यथा कायदेशीर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.