नवी दिल्ली : गेल्या महिन्यात 23 जानेवारी रोजी गौतम अदानी (Gautam Adani) यांनी विचारही केला नव्हता, एवढे वादळ त्यांच्या आयुष्यात आले. हे वादळ अजून ही घोंगावत आहे. केवळ एका अहवालाने अदानी साम्राज्य होत्याचे नव्हते झाले आहे. एकाच महिन्यात आलेखात उंचीवर असलेल्या कंपन्या धडाधड खाली घसरल्या आहेत. अद्यापही या समूहासाठी एकही दिवस आनंदाची बातमी घेऊन उगवला नाही. 24 जानेवारी रोजी अमेरिकन संशोधन फर्म हिंडनबर्गच्या अहवालाने (Hindenburg Report) अदानी समूहाची मोठी पडझड केली आहे. या कंपनीचे प्रमुख शेअर 80 टक्यांहून अधिक घसरले आहेत. गतवैभवासाठी अदानी समूह धडपडत आहे, पण गुंतवणूकदारांनी (Investors) विक्रीचे सत्र सुरुच ठेवले आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत गौतम अदानी यांनी सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. या काळात अदानी यांचे 77 अब्ज डॉलर (63,72,05,80,00,000 रुपये) स्वाहा झाले आहेत. एक काळ असा होता की जगातील ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते आणि काही काळातच ते जगातील क्रमांक एकचे श्रीमंत होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण नियतीचे फासे पलटले आणि अदानी समूह अद्यापही सावरला नाही.
अदानी यांच्या संपत्तीत तर मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या समूहाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या समूहाला 11 लाख कोटींचा फटका बसला आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवाल अदानी यांच्या समूहावर भारी पडला आहे. 24 जानेवारीपासून सुरु झालेले हे वादळ अजूनही शमलेले नाही. त्यात समूहाची एकूण संपत्ती 11 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
गौतम अदानी यांची संपत्ती सातत्याने घसरत आहे. सोमवारी अदानी यांची एकूण संपत्ती कित्येक वर्षानंतर 50 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या अब्जाधिशांच्या यादीत ते आता 25 व्या स्थानावरुन 29 व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. श्रीमंतांच्या यादीत त्यांची घसरण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत असाच प्रकार सुरु राहिल्यास ते टॉप-30 मधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.
गौतम अदानी आणि अदानी समूहाची सध्याची परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारही चिंतेत पडले आहेत. गेल्या एका महिन्यात त्यांची कमाईही झरझर खाली आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अदानी यांच्या कंपन्यांचे बाजारात अधिक मूल्य झाले होते. आता या कंपन्यांच्या मूल्यांमध्ये सुधारणा आली आहे. हा शेअर त्याच्या मूळ किंमतीवर खरा उतारला आहे.
24 जानेवारीपासून अदानी समूहासाठी एकच बाब दिलासादायक ठरली आहे, ती म्हणजे भारतीय रेटिंग एजन्सीजीने अद्याप या कंपन्यांचे मानांकन कमी केलेल नाही. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. 25 जानेवारी ते 21 फेब्रुवारी यांच्या दरम्यान अदानी समूहाच्या 10 सुचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 21.7 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत घसरण आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही या शेअर्सपासून एकतर दूर राहत आहेत. त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.