Inflation Shocks | ऑगस्टच्या (August) सुरुवातीलाच महागाईचे (Inflation) एका मागून एक धक्के जनतेला सहन करावे लागत आहे. सणासुदीच्या या दिवसात रेपो रेटच वाढला नाही तर या वस्तूंचे ही भाव वाढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. पण त्यांना गेल्या काही वर्षांत किती यश आलं हे जनतेसमोर आहे. कारण त्यांना रोज महागाईचा सामना करावा लागत आहे. जरी आगामी काळात महागाईचा दर कमी झाला तरी तो एकूण महागाईपेक्षा तो निश्चितच कमी असणार नाही. दरम्यान महागाईच्या आघडीवर हा आठवडा तितकासा चांगला राहिला नाही. एका मागोमाग जनतेला धक्के बसत आहेत. या आठवड्यात सीएनजी(CNG), पीएनजी (PNG), दही, तांदूळ यांचे दर आधीच वाढले आहेत. आता रेपो दरवाढीनंतर गृहकर्जासह (Home Loan) अन्य कर्जांचा ईएमआयही (EMI)वाढणार आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईच्या कारणांची मीमांसा केली आहे. जागतिक घटकांचा परिणाम भारतातील वस्तूंच्या किंमतींवर होत आहे. जगभरात महागाई विक्रमी पातळीवर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. भारत महागाईचा सध्या सामना करत आहे. जानेवारी ते जून या सलग महिन्यांत किरकोळ महागाई दर सातत्याने वरचढ ठरला आहे.
भूराजकीय घडामोडींमध्ये झपाट्याने बदल होत आहे. अन्नधान्याच्या जागतिक किमतींत घसरण होत आहे. नयुक्रेनमधून गव्हाची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे भावही कमी होत आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे यंदा मान्सूनने जोरदार आघाडी उघडली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या पेरणीमुळे आगामी काळात महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळू शकेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मात्र, यानंतरही किरकोळ महागाई दर चढाच राहिल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते,2022-23 मध्ये चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेपेक्षा 6.7 टक्के अधिक राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत तो 7.1 टक्के, डिसेंबरच्या तिमाहीत 6.4 टक्के आणि 23 मार्चच्या तिमाहीत 5.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या चार महिन्यांत रेपो रेटमध्ये आतापर्यंत 1.40 टक्क्यांची वाढ झाली असून सध्या तो 5.40 टक्के झाला आहे. रेपो दरवाढीचा परिणाम बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या (HFC) यांच्यावरही होऊ लागला आहे. गेल्या 2-3 महिन्यांत जवळपास सर्वच बँका, एनबीएफसी आणि एचएफसी यांनी व्याजदरात वाढ केली आहे. रेपो दरात नव्याने वाढ झाल्यानंतर व्याजदरात आणखी वाढ होण्याची भीती बळावली आहे. आतापर्यंतच्या दरवाढीवर नजर टाकली तर रेपो रेटमध्ये 1.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकाही याच प्रमाणात कर्जाचे व्याजदर वाढवत आहेत. आता यावेळी रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ झाली आहे, तेव्हा बँकांच्या व्याजदरातही याच प्रमाणात वाढ होणार आहे. आता समजा तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. तुमच्या बँकेनेही रेपो रेटच्या धर्तीवर व्याज वाढवले तर त्याचा दर 7.55 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांवर जाईल. यामुळे तुमचा ईएमआय 24,260 रुपयांवरून 25,187 रुपये होईल. म्हणजे ईएमआय दरमहा 927 रुपयांनी वाढेल.