सिमेंट गोणी (Cement Bag) मागे 30 नव्हे तर 50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कच्चा माल आणि इतर खर्चामुळे सिमेंट कंपन्यांनी सिमेंटचे भाव वाढवले आहेत. सिमेंट कंपन्यांनी 12 टक्के दरवाढ केली आहे. सिमेंट महागाईमुळे नवीन घर खरेदी (New Home Buy) अथवा नवीन घराचे बांधकाम (New Home Construction) सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाणार आहे.बांधकाम खर्चासाठी 25 टक्के स्टील गरजेचे आहे तर बांधकामासाठी 16 ते 17 टक्के सिमेंटची आवश्यकता आहे. स्टीलनंतर आता सिमेंटची गरज आहे. सिमेंटच्या किंमती 12 टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्यांचा आशियाना आवाक्याबाहेर गेला आहे. केवळ घरच नाही तर नवीन सिमेंटची रस्ते, महामार्ग, पुल, शाळा, इमारती, इतर मोठे प्रकल्प यांना या वाढत्या किंमतीच्या झळा बसतील. त्यामुळे ही कामे रेंगाळतील अथवा त्यांना पूर्ण होण्यास आता उशीर लागू शकतो.
यापूर्वी स्टीलच्या किंमती वाढल्या होत्या. त्यानंतर इतर साहित्य महागले होते. त्यात वीट, वाळू आणि अन्य बांधकाम साहित्याचा समावेश होता. मध्यंतरी सिमेंटच्या किंमती वाढल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा सिमेंट कंपन्यांनी खर्च परवडत नसल्याचे कारण देत पुन्हा भाव वाढ केली आहे. त्यामुळे घराचे बांधकाम करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही. वाढत्या महागाईने अगोदरच जिंदगाणीचे उदास गीत गाणा-या चाकरमान्याला हा वाढीव खर्च झेलणे जिकरीचे होणार आहे.
उत्पादन खर्च वाढल्याचे टुमने लावत कंपन्यांनी किंमत वाढीला दुजोरा दिला आहे. आयात होणा-या कोळशाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सिमेंटचे उत्पादन खर्च हाताबाहेर गेल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. त्यात भरीस भर म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दळणवळणावर कंपन्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे. सिमेंट कंपन्यांवर विश्वास ठेवला तर, कंपन्यांच्या दाव्यानुसार त्यांच्या उत्पादन खर्चात प्रति गोणी 60 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे, मग या कंपन्यांसमोर भाववाढीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
अर्थव्यवस्था कोरोनाशी दोन हात करुन आता कुठे रुळावर येत आहे. अशातच कंपन्यांनी पुन्हा सिमेंटची भाव वाढ केल्याने सर्वसामान्यांना खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. रेटिंग एजन्सी इक्रानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात देशात सिमेंट विक्रीत 7 ते 8 टक्के वाढ झाली आहे. सध्या विक्री 38.2 कोटी टन इतकी झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात विक्रीचा हा आकडा 35.5 कोटी टन इतका होता. आता किंमती वाढल्याने आणि मागणीतही वाढ होत असल्याने कंपन्यांच्या हिशेब खर्चात हा फायदा दिसून येईल.