नवी दिल्ली : भारतीयांचे सुवर्ण वेड जगाला माहिती आहे. चीन पाठोपाठ भारतात सर्वाधिक सोने आयात (Gold Import) होते. सुवर्ण अलंकार, दाग-दागिने, आभुषण, ठोक सोने, गोल्ड बाँड यासारख्या अनेक पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. परंतु, सोन्यातील (Gold Investment) एका पर्यायात अचानक लोकांनी गुंतवणूक करणेच जणू बंद केले. 2022 मध्ये ग्राहकांनी ज्वेलरी तर मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पण गोल्ड ईटीएफकडे सपशेल पाठ वळवली. सोन्याच्या किंमती (Gold Price) गगनाला भिडल्याने तसेच महागाई प्रचंड वाढल्याने ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्सकडे (ETF) पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये ईटीएफमधील गुंतवणूक 90 टक्क्यांनी घटून 459 कोटी रुपये इतकीच आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ( AMFI) यांनी याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 2021 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर 2020 मध्ये 6,657 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
पण गेल्यावर्षी सोन्याने जशी उसळी मारली, तशी गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला. त्यांनी ठोक सोने, दागिने, आभुषण यांची खरेदी केली. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली. पण ईटीएफकडे दुर्लक्ष केले. परंतु, गोल्ड ईटीएफच्या गुंतवणूकदार खातेदारांच्या पोर्टफोलिओंची संख्या वाढली आहे. 2021 पेक्षा 2022 मध्ये ही संख्या वाढली आहे.
मॉर्निंगस्टार इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक कविता कृष्णन यांच्या मते, सोन्याचे वाढते दर गुंतवणूकदारांना हैराण करत आहे. या वाढत्या किंमतींचा त्यांच्यावर दबाव आहे. अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाहीत. महागाईमुळे बचत करण्यावर बंधने येतात. सोने सुरक्षित साधन असले तरी वाढत्या किंमती चितेंचा विषय ठरल्या आहेत.
गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांपेक्षा शेअर बाजारात गेल्या वर्षी 2022 मध्ये अधिक गुंतवणूक केली आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी इन्स्टंट मनी कमाविण्यासाठी अनेक जण शेअर बाजाराकडे वळले आहेत.
2022 मध्ये गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये 1.6 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक वर्ष 2021 पेक्षा अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी 96,700 कोटी रुपये शेअर बाजारात आले होते. शेअर बाजारातून झटपट कमाई करता येईल, या आशेवर त्यांनी कमाई केली होती.
त्यानंतर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर भर दिला. पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (SIP) त्यांनी म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केली. इतर पर्यायांमध्ये केलेली बचत, गुंतवणूक काढून त्यांनी ती म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात लावली.
गोल्ड ईटीएफमधील पोर्टफोलिओंची संख्या डिसेंबर 2022 पर्यंत 14.29 लाखांनी वाढून ती 46.28 लाख झाली. डिसेंबर 2021 पर्यंत पोर्टफोलिओंची संख्या 32.09 लाख होती. पोर्टफोलिओची संख्या वाढली. पण गुंतवणूक कमी झाली.