अमेरिकेत नवीन सरकार आले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे 47 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ते विजयी होताच त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजार आणि व्यापारावर दिसून आला. इतकेच नाही तर तिथल्या फेडरल रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. या वर्षातील ही दुसरी व्याज दर कपात आहे. भारतातील कर्जदार गेल्या दोन वर्षांपासून व्याज दरात कपातीची मागणी करत आहेत. पण त्यांच्या तोंडाला पानं पुसल्या गेली आहेत. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर दर जैसे थे ठेवला आहे. त्यामुळे व्याजदर कायम आहे. महागाई आणि कर्जाच्या बोजाने नागरिक हैराण झाले आहेत. आता RBI ने पुन्हा ग्राहकांना धक्का दिला आहे.
व्याज दरात कपात नाही
आरबीआय रेपो दरात कपात केल्यावर Home Loan, Car Loan, Auto Loan आणि Education loan वरील व्याज दरात कपात करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. अमेरिकेत दोनदा व्याज दर कपात झाल्यावर आपल्याकडील कर्जदारांना रेपो दर कपातीची आशा लागली आहे. पण आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या आशेवर पाणी फेरले आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर वाढण्याचा अंदाज त्यांनी गुरुवारी वर्तवला. या महागाईत व्याज दर कपातीची जोखीम घेता येणार नाही. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि शैक्षणिक कर्जावरील व्याज दरात कोणतेही कपात होणे शक्य नसल्याचे समोर येत आहे.
गेल्या दोन वर्षात व्याज दरात नाही कपात
RBI ने गेल्या 2 वर्षांत व्याज दरात कोणतीही कपात केलेली नाही. आरबीआयने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्जदारांची निराशा झाली. आरबीआय गव्हर्नर यांनी व्याजदर जैसे थे राहण्याचे संकेत दिले आहे. आता पुढील पतधोरण समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.
परदेशात व्याज दरात कपात
परदेशात केवळ अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनेच व्याज दरात कपात केली नाही. तर कॅनाडातील केंद्रीय बँकेने जुलैपासून आतापर्यंत दोनदा व्याज दरात कपात केली आहे. युरोपियन केंद्रीय बँकेने व्याज दरात कपात केली आहे. भारत जगातील टॉप-5 अर्थव्यवस्था असताना आरबीआय निर्णायक भूमिका का घेत नाही असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यावर महागाई कमी झाल्याशिवाय व्याज दरात कपात होणार नाही, असे धोरण स्वीकारण्यात आले आहे.