नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : आता प्रेमाचं काय सांगता येतं म्हणा, कोणाला कुठं आणि कसं होईल, हे सांगता थोडं येतं. पण सार्वजनिक जीवनात वावरताना काही पथ्य पाळावी लागतात. ती पाळली नाही तर प्रेमाला सुद्धा माफी मिळत नाही. या कार्यालयातील हे प्रेम प्रकरण सध्या जगभर गाजत आहे. एका बॉस आणि कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचे अफेअर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तर ब्रिटिश पेट्रोलियम (BP) ही जागतिक कंपनी आहे. या कंपनीच्या सीईओ पदावर आता आता बर्नार्ड लूनी (BP CEO Bernard Looney) कार्यरत होता. त्याने कंपनीला यशाच्या शिखरावर आणलं. पण त्याचा पाय चांगलाच घसरला. त्याने कार्यालयातच सहकारी कर्मचाऱ्यासोबत इलू इलू सुरु केले. आता प्रेम झाकून थोडंच ठेवता येते. व्हायचं नको ते झालं. कुजबूज झाली. चर्चा झाली आणि मग बॉम्ब पडला. बर्नार्डला राजीनामा द्यावा लागला. त्याचे 32 वर्षांचं करिअरच या अफेअरमध्ये पणाला लागले.
कमी वयात मोठी झेप
तर बर्नार्ड लूनी अवघ्या 21 व्या वर्षी 1991 मध्ये बीपी कंपनीत रुजू झाला होता. त्याने जवळपास चार वर्षे सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली. 2020 पासून तो या पदावर होता. सध्या बर्नार्ड 53 वर्षांचा आहे. पण त्याचे मन तरुण आहे. त्याने ऑफिसमध्येच चक्कर चालवला. त्याची त्याला किंमत मोजावी लागली. सीईओ पदावरुन त्याला पायउतार व्हावे लागले. त्याने ही बाब कंपनी आणि संचालकांपासून लपवली. पण ही बातमी फुटल्यावर कंपनीच्या शेअरवर त्याचा परिणाम दिसून आला.
अचानक दिला राजीनामा
अफेअरची खुलेआम चर्चा झाल्यावर बर्नार्ड यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा दिला. बीपी कंपनीने तात्काळ शेअर बाजाराला राजीनाम्याची बातमी कळवली. त्याचा परिणाम दिसून आला. शेअरमध्ये मोठी घसरण झाली. त्यांनी हे कबुल केले की, संचालक मंडळाने त्याने या प्रेम प्रकरणाची माहिती दिली नाही. या नात्याविषयी मोकळेपणाने माहिती देणे आवश्यक होते, असे त्यांनी मान्य केले. कंपनीचे सीएफओ मुरे ऑशिक्लोस यांची अंतरिम सीईओ पदी निवड करण्यात आली.
गेल्यावर्षीच तक्रार
मे 2022 मध्येच बीपी कंपनीच्या संचालक मंडळाकडे बर्नार्ड लूनी यांच्या ऑफिसमधील या लिलांविषयीच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. संचालक मंडळाने याविषयी त्यांना खुलासा देण्यास सांगितले. त्यांनी कार्यालयातील महिला सहकारीसोबत जुने संबंध असल्याचे मान्य केले होते. पण त्या दोघांचे कार्यालयातील वागणूक कोणत्याही आचारसंहितेची भंग करणारी नसल्याचे सांगत कंपनीने प्रकरणावर पडदा टाकला होता. पण तक्रारी वाढल्यानंतर बर्नार्ड यांनी कंपनीला रामराम ठोकला.
16,000 कोटींचे नुकसान
बर्नार्ड यांच्या राजीनाम्याचे वृत्त शेअर बाजारात धडकताच कंपनीला त्याचा फटका बसला. कंपनीचे बाजारातील भांडवल 9,29,064.72 कोटी रुपयाहून थेट 9,12,189.36 कोटी रुपयांवर येऊन थांबले. बीपी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. मार्केट कॅपमध्ये 16,875.36 कोटींचे नुकसान कंपनीला सहन करावे लागले.