नवी दिल्ली : स्वस्तात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सरकारी येत्या सोमवारपासून स्वस्तात सोने खरेदीची संधी, नागरिकांना देत आहे. गुंतवणूकदार 6 मार्च 2023 रोजीपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत (SGB) गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ग्राहकांना पाच दिवसांत सोने खरेदी करता येईल. या गोल्ड बाँडसाठी एक ग्रॅम सोन्याचा भाव 5,611 रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याविषयीची सूचना दिली. त्यानुसार, 2022-23 च्या चौथ्या मालिकेतील सॉव्हरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond scheme 2022-23 -Series-IV) खरेदीसाठी पाच दिवसांचा कालावधी असले.
सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत 6 ते 10 मार्च या काळात स्वस्त सोने खरेदीची संधी मिळेल. सोमवारपासून जनतेला या योजनेत गुंतवणूक करता येईल. सोन्याचा भाव 5,611 रुपये प्रति ग्रॅम आहे. सेंट्रल बँकेने एक अधिकृत निवेदन दिले आहे. त्यानुसार, ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसमध्ये 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना गोल्ड बाँडची इश्यू प्राईस एका ग्रॅमसाठी 5,561 रुपये असेल.
सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्या सवलत मिळते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना बाँड जारी करण्यात येईल. गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 999 शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित होतो.
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर, 2015 पहिल्यांदा गोल्ड बाँड आणले होते. तेव्हापासून 2021 पर्यंत एकूण 25,702 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोल्ड बॉण्डच्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. गोल्ड बॉण्ड खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक किंवा सुरक्षिततेसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नसल्याने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा याची विक्री करणं सोपं आहे. या योजनेत सोमवारपासून गुंतवणुकीची संधी मिळत आहे.