नवी दिल्ली : अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल (Quarter Result) हाती येत आहेत. काही कंपन्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. ही कमाई गुंतवणूकदारांच्या पदरात पण पडणार आहे. शेअर बाजारात या कंपनीने स्वतःचे असे वेगळेपण सिद्ध केले आहे. चिकटवण्यात माहिर असलेल्या या कंपनीचे तिमाही निकाल जोरदार आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांना (Investors) लॉटरी लागली आहे. कंपनीला जबरदस्त नफा झाल्याने कंपनीने 1100 टक्के लाभांश (Dividend) देण्याची घोषणा केली आहे. या दिवशी गुंतवणूकदारांच्या हातात कोऱ्या करकरीत नोटा येणार आहेत. तुमच्याकडे आहे का हा स्टॉक…
मजबुती का जोड
पिडीलाईट (pidilite) ही कंपनी कदाचित तुम्हाला नवीन वाटतं असेल, पण या कंपनीचे फेव्हिकॉल, एम-सील अशा काही उत्पादनांची नावे तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला त्याचा फायदा लागलीच लक्षात आला असेल. आज भारतातील जवळपास प्रत्येक घरात हा मजबूतीचा जोड दिसतोच. या कंपनीची स्थापना 1959 साली झाली होती. बळवंत पारेख यांनी ही कंपनी सुरु केली होती. फेविकॉल या कंपनीचा ब्रँड भारताने डोक्यावर घेतला. MOVICOL या जर्मन कंपनीच्या नावावरुन प्रेरणा घेऊन FEVICOL ही कंपनी स्थापन करण्यात आली.
इतका झाला फायदा
पिडीलाईट (pidilite) कंपनीला डिसेंबर-मार्च या तिमाहीत जबरदस्त फायदा झाला. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा आणि कमाई या दोघांमध्ये मोठी वृद्धी दिसून आली. कंपनीने निकालासोबत लाभांश पण जाहीर केला. चौथ्या तिमाहीत या कंपनीला 283 कोटी रुपयांचा फायदा झाला. गेल्यावर्षी याच तिमाहीत या कंपनीला 254.4 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
महसूल असा वाढला
कंपनीच्या कमाईत वाढ झाली. गेल्यावर्षी समान तिमाहीत या कंपनीचा महसूल 2,507.1 कोटी रुपये होता. डिसेंबर-मार्च 2023 तिमाहीत 2,689.3 कोटी रुपयांपर्यंत हा महसूल पोहचला. चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 401.1 कोटी रुपयांहून 459.2 कोटी रुपये इतका झाला. तर EBITDA मार्जिन 16 टक्क्यांहून वाढून 17.1 टक्के झाला.
प्रत्येक शेअरमागे इतका लाभांश
Pidilite व्यवस्थापन बोर्डाने प्रत्येक शेअरमागे गुंतवणूकदारांना 11 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. निकालापूर्वी पिडीलाईटच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. कंपनीच्या शेअरमध्ये 0.70 टक्के घसरण आली. हा शेअर 2,454.90 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये चढउतार सुरु आहे. तरीही गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांकडे जेवढे जास्त शेअर असतील, त्याला तेवढा मोठा फायदा होणार आहे.
कधी मिळेल लाभांश
फेविकॉल निर्मिती करणाऱ्या या कंपनीने लाभांश वितरणाची माहिती शेअर बाजाराला दिली. त्यानुसार, संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी 1 रुपया प्रति इक्विटी शेअर 11 रुपयांचा लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली आहे. लाभांशचा फायदा 30 दिवसांत देण्यात येईल. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2023 रोजी लाभांशाची रक्कम शेअरधारकांना देण्यात येईल.