शेअर बाजारावर सध्या चिंतेचे ढग जमा झाले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टींनी आज सपशेल लोटांगण घातले. बाजारच नाही तर गुंतवणूकदार आज सैरभैर झाले. त्यांना मोठा फटका बसला. पण अशा भयावह परिस्थिती पण या शेअरने दमदारपणे किल्ला लढवला. बाजारात दिग्गज शेअर घसरणीवर असताना या शेअरने मोठी खेळी केली. या शेअरची घोडदौड आज आलेले तुफान पण थांबवू शकले नाही. अनिल अंबानी यांच्या दोन कंपन्यांवर बाजारातील या गडगडाटाचा काहीच परिणाम झाला नाही.
दोन्ही शेअरची जोरदार कामगिरी
गुरुवारी शेअर बाजार उघडताच आपटला. सेन्सेक्ससह निफ्टीचे पानीपत झाले. पण रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने मोठी भरारी घेतली. गुरुवारी रिलायन्स पॉवरच्या शेअरला 5 टक्के अप्पर सर्किट लागले. हा शेअर 53.65 रुपयांवर, 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचला. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 4.1 टक्क्यांनी वधारले. हा शेअर 345.80 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला.
शेअरच्या उसळीमागे कारण तरी काय?
रिलायन्सच्या या दोन शेअरच्या उसळीमागे व्यावसायिक घडामोडी आहेत. कंपनीने भुतानसोबत व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या बुधवारी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने शेजारील देशात 1,270 मेगवॅट सोलर आणि हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर योजना सुरु करण्याची घोषणा केली. या घडामोडीनंतर आज बाजारात भूकंप झालेला असताना पण हा शेअर दुडुदुडु पळाला. गेल्या काही सत्रामध्ये या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. कंपनीचा शेअर एका महिन्यात 85 टक्क्यांनी वधारला. तर रिलायन्स इन्फ्राचा शेअर एका महिन्यात 70 टक्क्यांपर्यंत वधारला. आज बाजार 1300 हून अधिक अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे काही मिनिटात 6 लाख कोटींहून अधिक रुपये स्वाहा झाले. तरीही अनिल अंबानी यांच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी दिसून आली.
भूतान सरकार आणि अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर यांच्यात एक करार झाला आहे. त्यानुसार, भूतानमध्ये हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी रिलायन्स समूहाने रिलायन्स इंटरप्रायजेस ही कंपनी तयार केली आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा या दोन्ही कंपन्या नवीन कंपनीचा कारभार पाहतील. येत्या दोन वर्षांत भूतानमध्ये 500 मेगावॅट विद्युत सौर यंत्र बसविण्यात येणार आहे.