नवी दिल्ली : एफएमजीसी (FMGC) क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसीच्या शेअरमध्ये (ITC Share) सध्या जोरदार तेजी दिसून येत आहे. हा शेअर एनएसईवर (NSE) 5 टक्क्यांपेक्षा अधिक तेजीसह 380.66 रुपये प्रति शेअरवर व्यापार करत आहे. तर इंट्राडेवर हा शेअर 6 टक्क्यांच्या तेजीसह 384.70 रुपयांवर पोहचला आहे. बजेटनंतर या शेअरमध्ये 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. केंद्रीय अर्थसंकल्पात सिगारेटवर कर वाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सिगारेट ओढाणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. पण आयटीसीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मात्र फायदा होईल. आयटीसीचा शेअर येत्या काही दिवसात नवीन रेकॉर्ड तयार करेल की नाही, हे लवकरच दिसून येईल. पण यापूर्वी गुंतवणूक केलेल्यांना या शेअरमधून चांगली कमाई करता आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सिगारेट वरील करात 16 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या घोषणेनंतर आयटीसीच्या शेअरवर दबाव दिसून आला. परंतु हा दबाव काही काळच टिकला. त्यानंतर या शेअरने झपाट्याने आगेकूच केली. शेअरने नवीन उच्चांक गाठला.
विश्लेषकांच्या मते, कर वाढीचा निर्णय आल्याने गुंतवणूकदार काही काळ धास्तावले. त्यांनी विक्रीचा सपाटा लावला. पण एकून कराच्या केवळ 1 ते 2 टक्केच वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्टॉकमध्ये रिकव्हरी आली. NCCD हा सिगारेटवरील एकूण कराचा एका हिस्सा आहे.
सध्या सिगारेटवर एकूण 52.7 टक्के कर लागू आहे. यामध्ये जीएसटी, उत्पादन शुल्क, एनसीसीडी यांचा समावेश आहे. एनसीसीडी एकूण कराच्या केवळ 10 टक्के आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर एकूण 75 टक्के कर लावण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट कंपन्यांना सिगारेटच्या दरात 2 ते 3 टक्के वाढ करण्याची गरज आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे एका सिगारेटवरील कर 0.07 रुपयांहून 0.12 रुपये झाला आहे. त्यामुळे प्रति सिगारेट दरात फार मोठी वाढ होणार नाही.
एकीकडे सिगारेटचा झुरका ओढणाऱ्यांच्या खिशाला ताण पडणार आहे. तर दुसरीकडे या सिगारेट कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचा जोरदार फायदा होईल. तिमाही निकालात कंपनीला जोरदार फायदा झाला आहे. कंपनीला वर्षाआधारीत 21 टक्के नफा झाला आहे. जोरदार निकालानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश घोषीत केला आहे.
जोरदार निकालानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश घोषीत केला आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांना 6 रुपये प्रति शेअर असा तगडा लाभांश जाहीर करण्यात आला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. कच्चा मालासाठी कंपनीला अधिक खर्च पडला. हा खर्च तिमाहीत 21 टक्के वाढला आहे.