नवी दिल्ली : विमान प्रवाशांसाठी आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून विमान इंधनाचे दर (Air Turbine Fuel) कमी करण्यात आले आहेत. आज जेट फ्युलमध्ये करण्यात आलेल्या कपातीनंतर राजधानी दिल्लीमध्ये जेट फ्युलचा (jet fuel) दर 1,23,039.71 रुपयांवरून कमी होऊन 1,21,475.74 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे. जेट फ्युलच्या दरात आज प्रति किलोलीटरमागे 1563.97 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जेट फ्युल (ATF) स्वस्त झाल्याने याचा परिणाम हा विमानाच्या प्रवास भाड्यावर होणार असून, विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार कोलकातामध्ये जेट फ्युलचे दर 1,26,369.98 प्रति किलोलीटर आहेत. मुंबईत जेट फ्युलचा दर 1,20,306.99 रुपये असून, चेन्नईमध्ये जेट फ्युलचा दर 1,25,725.36 रुपये प्रति किलोलीटर इतका आहे. देशातील सर्वात स्वस्त जेट फ्युल मुंबईमध्ये तर सर्वात महाग कोलकातामध्ये आहे.
गेल्या महिन्यात 16 मे रोजी जेट फ्युलच्या दरात प्रति किलोलीटर मागे 6,188 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीमध्ये एटीएफचा दर प्रति किलोलीटर 1,23,039.71 रुपयांवर पोहोचला होता. तर कोलकातामध्ये एटीएफचा दर 1,27,854.60 रुपये मुंबईमध्ये प्रति किलोलिटर 1,21,847.11 रुपये आणि चेन्नईमध्ये जेट फ्युल 1,27,286.13 रुपये प्रति किलोलीटर मिळत होते. मात्र आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार जेट फ्युलच्या दरात 1563.97 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर, सीएनजी, पीएनजी अशा सर्वच इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरवाढीच्या बाबतीत जेट फ्युल देखील मागे नाही. चालू वर्षात आतापर्यंत जेट फ्युलचे दर 46,938 रुपये प्रति किलोलीटर एवढे प्रचंड वाढले आहेत. चालू वर्षात जेट फ्युलच्या दरात 61.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी विमानाच्या भाड्यात देखील वाढ झाली असून, प्रवास महागला आहे. एक जानेवारी 2022 रोजी एटीएफचे दर 76,062 रुपये प्रति किलोलिटर एवढे होते. 16 मेपर्यंत त्यात वाढ होऊन ते 1,23,039.71 रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचले. मात्र आज एटीएफच्या दरात कपात करण्यात आली आहे.
विमानासाठी वापरण्यात येणारे इंधन जेट फ्युलचे दर महिन्यातून दोनदा बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमती लक्षात घेऊन, देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्या त्यानुसार इंधनाच्या दरात बदल करतात. महिन्याच्या एक आणि सोळा तारखेला एटीएफचे नवे दर जाहीर केले जातात. दरम्यान आता जेट फ्युलचे दर कमी झाल्याने विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विमान भाड्यात वाढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.