नवी दिल्ली : डियाजियो (Diageo) ही जगातील सर्वात मोठी दारु बनविणारी कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ भारतीय मूळ असलेले इवॉन मॅन्युअल मेनेजेस (Ivan Manuel Menezes) आता काळाच्या पडद्याआड गेले. बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कंपनीने याविषयीची माहिती दिली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 64 वर्षीय मेनेजेस याच महिन्यात निवृत्त होणार होते. पोटातील अल्सर आणि इतर त्रासामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचे भारताशी विशेष नाते होते. ही गोष्ट या व्हिस्कीवर प्रेम करणाऱ्या अनेकांना माहिती नाही..
आता हे नवीन सीईओ
डियाजियोने सोमवारी नवीन सीईओची घोषणा केली. मेनेजेस यांच्यावर उपचार सुरु असल्याने डेबरा क्रू यांनी सीईओ पदाचा कार्यभार तात्काळ हाती घेतला. डियाजियो ही जगातील सर्वात मोठी दारु बनविणारी कंपनी आहे. भारतात ही कंपनी जॉनी वॉकर (Johnnie Walker) स्कॉच व्हिस्की तयार करते. युनाइटेड स्पिरिट्स (United Spirits) या कंपनीत पण डियाजियोचा मोठा हिस्सा आहे.
पुण्याशी खास नाते
अल्सरच्या शस्त्रक्रियेनंतर इवान यांची तब्येत नाजूक झाल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या सीईओकडे तात्पुरता पदभार लागलीच सोपविण्यात आला. इवान मेनेजेस यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांचे वडील मॅन्युअल मेनेजेस भारतीय रेल्वे बोर्डाचे चेअरमन होते. मेनेजेस यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफंस कॉलेज आणि भारतीय प्रबंधन संस्थान, अहमदाबाद येथून पुढील शिक्षण पूर्ण केले.
असा झाला प्रवास
1997 मध्ये गिनिज आणि ग्रँड मेट्रोपॉलिटन या दोन कंपन्यांचे विलिनिकरण झाले. त्यानंतर डियोजियो ही कंपनी अस्तित्वात आली. तेव्हाच मेनेजेस तिच्यासोबत जोडल्या गेले. जुलै, 2012 मध्ये कंपनीच्या कार्यकारी निदेशक आणि जुलै, 2013 मध्ये ते या कंपनीचे सीईओ झाले. त्यांना 2023 मध्ये नाईट ही पदवी देण्यात आली होती. त्यांचा भाऊ व्हिक्टर मेनेजेस हे सिटी बँकेचे पूर्व चेअरमन आणि सीईओ आहेत. डियाजियोच्या देखरेखी खाली जॉनी वॉकर व्हिस्की, Tanqueray जिन आणि डॉन ज्युलिओ टकीला हे ब्रँड तयार होतात.
जगातील मोठा ब्रँड
डियोजियो ही जगातील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. व्हिस्की, रमपासून अनेक दर्जेदार ब्रँड तयार करण्यात ही कंपनी नावाजलेली आहे. या कंपनीने ग्राहकांचा विश्वास कमाविला आहे. जगातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून ही कंपनी प्रसिद्ध आहे. मेनेजेस यांच्या काळात या कंपनीने मोठी प्रगती साधली. ही कंपनी जगातील180 हून अधिक देशांमध्ये 200 अधिक ब्रँडची विक्री करत आहे. आज ही कंपनी स्कॉच, व्हिस्की, वोडका, जिन, रम, कॅनेडियन व्हिस्की, लिकर आणि टकीला या ब्रँडमध्ये पण अग्रेसर आहे.