नवी दिल्ली : सुधा मूर्ती (Sudha Murty) यांना कोण ओळखत नाही. त्यांचे कॅनव्हॉस फार मोठे आहे. त्या चालते-बोलते विद्यापीठच आहेत. ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या त्या सासू आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या त्या अध्यक्षा आहेत. सिद्धहस्त लेखिका आणि ही न थांबणारी यादी आहे. साधेपणा, विनम्रता आणि मिश्किल स्वभाव ही त्यांची जमेची बाजू. मध्यमवर्गीय कुटुंबातील सुधा मूर्ती यांनी टाटा समूहाचे (Tata Group) चेअरमन आणि दिग्गज उद्योगपती जेआरडी टाटा (JRD Tata) यांना पत्र लिहून जाब विचारला होता, काय होता तो किस्सा, जाणून घ्या…
टाटा इन्स्टिट्यूटमधून एम टेक
1974 मध्ये सुधा मूर्ती या बेंगळुरु येथील टाटा इन्स्टिट्यूट मधून एमटेक करत होत्या. त्याकाळी मध्यमवर्गीय कुटुंबातून मुलींना इतके शिक्षण घेण्याची मूभा नव्हती. पण कुटुंबातील मोकळीकीमुळे त्यांनी बीई पूर्ण केलं आणि नंतर एमटेकला प्रवेश घेतला. या विद्यालयात सर्व मुलांमध्ये त्या एकट्याच होत्या. त्यांना अमेरिकेतून पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार होती, पण येथेच त्यांच्या आयुष्यात यू-टर्न आला.
मुलींनी अर्ज करण्याची गरज नाही
सुधा मूर्ती त्यांच्या होस्टलला जात असताना त्यांना नोटीस बोर्डवर एक जाहिरात दिसली. टेल्को पुणे आणि जमशेदपूर येथील प्लँटसाठी अभियंत्याची गरज होती. नोकरीची संधी होती. पण या जाहिरातीत सर्वात खाली, मुलींनी अर्ज करण्याची गरज नाही, असा मजकूर लिहला होता. जसे सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा असतो, तसाच काहीसा हा प्रकार असल्याचे सुधा मूर्ती यांना वाटले. त्यांना खूप राग आला. त्यांनी रागातच पोस्टकार्ड वर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
पण पत्ता कुठे माहिती होता
महिलांची शिक्षणात अडवणूक, नोकऱ्यांमध्ये अडवणूक, मग त्यांना संधी देणार तरी कोण? असा समज ही मग प्रगती कशी साधणार, असा समाज कधीच उन्नत होणार नाही, असा जाब विचारत सुधा मूर्ती यांनी पोस्ट कार्डवर भावना व्यक्त केल्या. पण हे पोस्ट कार्ड जेआरडी टाटा यांच्यापर्यंत पोहचवणार तरी कसे, त्यांच्याकडे तर पत्ता पण नव्हता. त्यांनी यावर युक्ती शोधली. जेआरडी टाटा, टेल्को बॉम्बे… असा पत्ता लिहून पत्र पोस्ट केले.
टाटा यांना आला राग
जेआरडी टाटा हे प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांच्या हातात हे पोस्टकार्ड पडले. हे पत्र वाचून त्यांचा पारा चढला. त्यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना समक्ष उभं केलं. त्यांनी पोस्ट कार्ड दाखवत त्यांना जाब विचारला. एका मुलीने अन्याय होत असल्याचा जाब विचारल्याचे सांगत, तिला संधी देण्याची शिफारस केली. सुधा मूर्ती यांना पुणे येथील टेल्कोत नोकरी मिळाली.