Share Market Update : बाजाराची काय राहील चाल, नफा कसा कमवाल

| Updated on: Apr 16, 2023 | 5:19 PM

Share Market Update : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यापूर्वी पुढील आठवड्यात काय घडामोडी घडतील आणि कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, हे समजून घ्या.

Share Market Update : बाजाराची काय राहील चाल, नफा कसा कमवाल
Follow us on

नवी दिल्ली : आज रविवार आहे. किरकोळ गुंतवणूक करणाऱ्यांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वच जण रविवारी पुढील आठवड्याचा अंदाज बांधतात. त्यासाठीचे अपडेट जाणून घेतात. कंपनीचा पोर्टफोलिओ (Company Portfolio) तपासतात. याविषयीच्या घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे सोमवारच्या शेअर बाजारात (Share Market) त्यांच्याकडील ही शिदोरी त्यांना एकतर नफा कमवून देते अथवा त्यांचे मोठे नुकसान टळते. रिसर्च करुन गुंतवणूक करणाराच पट्टीचा गुंतवणूकदार (Investors) मानण्यात येतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यापूर्वी पुढील आठवड्यात काय घडामोडी घडतील आणि कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, हे समजून घ्या.

कशाचा करावा अभ्यास
तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी देशातील आणि परदेशातील बाजाराची स्थिती, घटक समजून घ्यावेत. तिथल्या घडामोडींचा अचूक अंदाज बांधावा. एखाद्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर या कंपनीचे प्रकल्प, व्यावसायिक वृद्धी, कंपनीचा तिमाही अहवाल, नवीन प्रकल्प, त्याचे फायदे-तोटे याविषयीची माहिती घ्यावी. महागाई दर, कंपन्यांचे अहवाल, कच्चे तेल आणि डॉलरची परिस्थिती, सरकारचे धोरण याचाही मोठा परिणाम होतो. येत्या आठवड्यात गुंतवणूकदारांनी या सर्व घटकांची उजळणी केली तर त्याला बाजाराची चाल (Share Market Next Week) लक्षात येऊ शकते.

या कंपन्यांच्या शेअरवर दिसेल परिणाम
काही कंपन्यांचे तिमाही निकाल या आठवड्यात हाती येतील. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भूराजकीय परिस्थितीचा परिणाम दिसून येईल. सोमवारी बाजारात इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल हाती आल्याने बाजार त्यावर प्रतिक्रिया देईल. मार्चच्या तिमाही निकालात एचडीएफसी बँकेला 20.6 टक्के शुद्ध फायदा झाला. बँकेला एकूण 12,594.5 कोटींचा फायदा झाला. इन्फोसिसने तिमाही निकाल जाहीर केले असले तरी अपेक्षेवर ते खरे उतरले नाहीत. पुढील आर्थिक वर्षात कंपनीने चार ते सात टक्के महसूल जमा होण्याचा अंदाज बांधला आहे.

हे सुद्धा वाचा

सेन्सेक्समध्ये वाढ
गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 598.03 अंक अथवा 0.99 टक्क्यांनी वाढला. एनएसई पण दमदार वाटचाल करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बाजाराने आनंदवार्ता आणली आहे. पुढील आठवड्यात कंपन्याचे तिमाही निकाल बाजाराची दिशा ठरवतील.

या 5 गोष्टी ठरवतील दिशा

  1. घाऊक किंमत निर्देशांक, जागतिक कल आणि परदेशी निधीच्या हालचालींवर आधारित चलनवाढ आकडेवारी या आठवड्यात शेअर बाजारांची दिशा निश्चित करेल
  2. मार्च महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारीत आकडे सोमवारी हाती येतील
  3. कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होईल. तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय महागाईची दिशा ठरवेल
  4. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची स्थिती कशी आहे, त्यावर बाजार प्रतिक्रिया देऊ शकतो
  5. याच आठवड्यात एचसीएल टेक्नॉलॉजीज, हिंदुस्थान झिंक, टाटा कॉफी आणि टाटा कम्युनिकेशन्स सारख्या मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल हाती येतील. त्यावर बाजार प्रतिक्रिया देईल