मुंबई : सध्या जवळपास सर्वच बँका क्रेडिट कार्ड घेण्यासाठी विविध ऑफर देत आहेत. क्रेडिट कार्डचा व्यवहार अनेकांना सोयीचाही वाटतो, पण त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कार्डच्या माध्यमातून खरेदीसाठी पैशांची गरज पूर्ण केली जाऊ शकते. क्रेडिट कार्ड पीओएसमध्ये स्वाईप केल्यानंतर सर्वात पहिला मेसेज मर्चंटला जातो. त्यानंतर कार्ड जारी करणाऱ्या कंपनीकडे पेमेंटची परवानगी मागितली जाते. कार्डमध्ये क्रेडिट मर्यादा शिल्लक असेल तर तुमचा व्यवहार होतो.
क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी काही खास टिप्स
क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर सिक्युरिटीबाबतची माहिती असणं आवश्यक आहे. कारण, हॅकर्सकडून काही क्षणात खातं रिकामं केलं जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जेव्हा तुमचं कार्ड बँकेकडून पाठवलं जातं, त्यावर सिक्युरिटीबाबत कोणती काळजी घ्यायची याच्या टिप्सही दिल्या जातात.
क्रेडिट कार्ड युझर्सने स्टेटमेंट आणि व्यवहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक 15 दिवसांना अकाऊंट स्टेटमेंटवर नजर टाकणं फायद्याचं ठरु शकतं. म्हणजे एखादा तुम्ही न केलेला व्यवहार आढळल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी योग्य ठरतं. या परिस्थितीमध्ये बँक किंवा पोलिसांमध्ये तक्रार देऊन नुकसान टाळलं जाऊ शकतं.
क्रेडिट कार्डमधून अनामत रक्कम चुकूनही काढू नका. अनेक जण क्रेडिट कार्ड मर्यादेतील काही पैसे काढतात आणि ते डेबिट कार्डमध्ये टाकतात. पण ही चूक ठरु शकते. कारण, यावर जे व्याज द्यावं लागतं ते दुप्पट होईल. यासोबत टॅक्सची रक्कमही जोडली जाते आणि व्याजासह रक्कम परत करणं भाग असतं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी 2019 मध्ये क्रेडिट कार्डच्या संख्येत 24.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.