नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : अमेरिकेच्या दोन फर्म अदानी समूहाच्या चांगल्याच मानगुटीवर बसल्या आहेत. यापूर्वी हिंडनबर्ग रिपोर्ट आणि आता OCCRP च्या रिपोर्टने अदानी समूहाला मोठा फटका दिला. अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि पार्ट-टू-एनर्जीविरोधात OCCRP ने गंभीर आरोप केले आहेत. काल विरोधी पक्षांनी मुंबईत तोच धागा पकडून विरोधाचा सूर आळवला. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. अदानी समूहातील अनेक शेअर्स या घडामोडींमुळे गडगडले. त्याचा फटका भारतीय आर्युविमा महामंडळाला (Life Insurance Company of India-LIC) पण बसला. सरकारी विमा कंपनीने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांच्या बाजार भांडवल घसरल्याने एलआयसीचे नुकसान झाले. त्यांच्या शेअरचे मूल्य पण घसरले.
अदानी समूहात घसरणीचे सत्र
किती बसला फटका?
गुरुवारी अदानी समूहाला 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. एक्सचेंजच्या आकड्यानुसार, 30 ऑगस्ट 2023 रोजी अदानी समूहातील सर्व 10 शेअरमध्ये घसरण झाली. बाजारातील एकूण भांडवल 10.84 लाख कोटी रुपयांनी घसरले. तर 31 ऑगस्ट रोजी हे नुकसान 10.49 लाख कोटी रुपयांवर पोहचले. एकाच दिवसात अदानी समूहात जवळपास 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
एलआयसी बसला इतका फटका
35,000 कोटी रुपयांच्या या नुकसानीत एलआयसी पण एकाच सत्रात 1,439.8 कोटी रुपयांचा वाटा आहे. एलआयसीला इतका फटका बसला आहे. LIC ने अदानी समूहातील सहा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. डाटानुसार, 30 जून रोजी एलआयसीकडे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिकमध्ये 9.12 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 4.26 टक्के, अदानी टोटल गॅस, एससीसी आणि अंबुजा सिमेंट्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे.
काय आहे आरोप
जगातील दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) अदानी समूहावर गंभीर आरोप लावले आहेत. फर्मच्या दाव्यानुसार, अदानी कुटुंबियांच्या भागीदारांनी शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ऑफ शोर’ म्हणजे Opaque फंडचा वापर केला. म्हणजे कुटुंबियांनीच बाहेरुन गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.