सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या (LIC) शेअरच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या व्यवहारात एलआयसीच्या शेअरने (LIC stock price) घसरणीचा नवा नीच्चांक नोंदविला आहे. शेअर बाजारात लिस्टेड झाल्यानंतर एलआयसीच्या शेअरची किंमत 800 रुपयांच्या खाली आल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. इतकेच नाही तर या शेअर्सने (stock) ट्रेडिंग दरम्यान 775 रुपयांचा नवा लाइफटाइम नीचांक देखील बनवला आहे. एलआयसीच्या शेअर्सची अवघ्या आठवड्याभरात वाईट पध्दतीने घसरण झालेली दिसून येत आहे. यात, अनेक गुंतवणूकदारांचे नुकसानही झालेले दिसून येत आहे.
सोमवारच्या (6 जून) ट्रेडिंग दरम्यान एलआयसीचा शेअर 775.40 रुपयांच्या पातळीवर घसरला होता. आतापर्यंतची एलआयसीच्या शेअर्सही ही सर्वाधिक खराब कामगिरी मानली जात आहे. बाजार बंद झाल्यानंतर सोमवारी शेअर 22.85 रुपयांनी म्हणजेच 2.86 टक्क्यांनी घसरून 777.40 रुपयांवर बंद झाला. एलआयसीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बाजारात लिस्टींग होउन झाला आहे आणि लिस्ट झाल्यानंतर त्याच्या शेअरची किंमत 11 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.
शेअर्सच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे, एलआयसीचे मार्केट कॅप आता 5 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. आयपीओच्या इश्यू प्राईसच्या वरच्या बँडनुसार, एलआयसीचे मूल्य 6,00,242 कोटी रुपये होते. सध्या त्याचे मूल्य 4,91,705.32 कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ असा, की ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओत पैसे गुंतवले आहेत त्यांनी आतापर्यंत 1.08 लाख गमावले आहेत. एलआयसी स्टॉकमध्ये येईपर्यंत एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, पहिल्याच दिवशी एलआयसीचा शेअर 13 टक्क्यांपर्यंत घसरला होता आणि शेवटी तो 8.62 टक्क्यांनी म्हणजेच 867.20 रुपयांवर स्थिरावला होता.
आतापर्यंत, इश्यू किमतीच्या तुलनेत तो 18 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
दरम्यान, ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने एलआयसीचे कव्हरेज सुरू केले आहे. फर्मने एलआयसीला होल्ड रेटिंगसह 875 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. जर एमके ग्लोबलचा अंदाज बरोबर निघाला, तर याचा अर्थ असा, की ज्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे त्यांना तोटा सहन करावा लागेल.