नवी दिल्ली : तुम्हाला ही एक दोन दिवसाआड गोड आवाजात फ्री क्रेडिट कार्डसाठी (Free Credit Card) कॉल येतो का? कार्डवर किती फायदे मिळतात. त्यासाठी तुमच्याकडून बँक (Bank) काहीच शुल्क (Charges) आकारत नाही असा दावा करण्यात येतो, तो खरा असतो का? त्यात टर्म्स अॅंड कंडिशन अप्लाईड (Terms and Condition) असते का? ही लपवाछपवी काय असते? समजून घेऊयात..
बँक क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क आकारण्यात येते. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे, बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यासाठी वार्षिक शुल्क द्यावे लागते. हा मेंटेनन्स चार्ज (Maintenance Charges) असतो. तर काही क्रेडिट कार्डवर बँक असे कुठलेही शुल्क आकारत नाही. हे कार्ड आयुष्यभरासाठी मोफत असते.
जर तुम्ही आयुष्यभरासाठी मोफत क्रेडिट कार्ड घेत असाल तर तुम्हाला शुल्क आकारणी केल्या जात नाही. बऱ्याच बँका आणि कंपन्या शुन्य वार्षिक शुल्क ( Yearly Zero Charges) असलेल्या क्रेडिट कार्डची ऑफर देतात. पण यामागील खरेपणा काय आहे तो, समजून घेऊयात..
काही क्रेडिट कार्डवर काहीच वार्षिक शुल्क आकारण्यात येत नाही. त्यावर रिवॉर्ड आणि फायदे असतात. नियमीत क्रेडिट कार्डपेक्षा हे फायदे जास्त नसले तरी काही प्रमाणात तुम्हाला त्याचा लाभ होतो.
तर काही क्रेडिट कार्डवर टर्म्स अँड कंडिशन असते. वार्षिक शुल्कापासून वाचण्यासाठी तुम्हाला एका मर्यादेपर्यंत त्यावर खरेदी करावीच लागते. त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्डसंबंधीचे नियम बारकाईने वाचावे लागतील. जर तुम्ही एका निश्चित रक्कमेपर्यंत खर्च करणार असाल तरच हे क्रेडिट कार्ड तुम्हाला घ्यायला हवे.
तर काही बँका क्रेडिट कार्डवर काही दिवसच मोफत सवलत पुरवितात. हा कालावधी संपला की क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला वार्षिक शुल्क आकारण्यात येते.पण सवलत समाप्त झाली की तुमच्यासमोर दोन पर्याय असतात. एक तर वार्षिक शुल्क जमा करणे अथवा क्रेडिट कार्ड बंद करणे.
एखाद्यावेळी बँक अथवा कंपनी स्वतःचे क्रेडिट कार्डचे उत्पादन स्वतःहून बंद करु शकते. त्यासाठी कोणतेही कारण पुढे केल्या जाऊ शकते. कार्ड बंद करायचे की सुरु ठेवायचे हा सर्वस्वी बँकेचा अधिकार असतो.
एकूणच आयुष्यभरासाठी मोफत क्रेडिट कार्डची ऑफर जरी असली तरी ती काही कालावधींकरीताच असू शकते. कॉल करताना या गोष्टी लपविण्यात येतात. तेव्हा थेट शाखेत जाऊन अथवा ऑनलाईन पद्धतीने त्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.