नवी दिल्ली : तुम्हाला ही प्रश्न पडलाच असेल, नाही का? घरात तुम्ही किती रोख रक्कम (Cash) ठेऊ शकता, याविषयीचे कुतुहल सर्वसामान्य लोकांना असतेच. तर घरात किती रोख रक्कम ठेवावी याविषयीची निश्चित अशी मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. तुम्हाला अमर्याद (Unlimited) कॅश ठेवता येते. परंतु, एकच अट आहे, या रोख रक्कमेचे उत्पन्नाचे(Source of Income) साधन तुम्हाला सादर करावे लागेल. म्हणजे ही रोख रक्कम तुम्ही कशी मिळवली, कमाई केली त्याचा तपशील सादर करावा लागेल.
जर हे रोखीतील उत्पन्न कर पात्रतेच्या परीघात येत असेल तर त्यावर तुम्हाला करही मोजावा लागेल. त्यामुळे उत्पन्नाचे साधन असेल आणि त्याचा तपशील असेल तर कितीही रक्कम तुम्हाला घरात ठेवता येते. त्यासंबंधीची मर्यादा ठरवून देण्यात आलेली नाही.
तसेच तुम्ही उत्पन्नावर कर भरत असाल तर तुम्हाला कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास हरकत नाही. त्याविषयीचे योग्य कागदपत्रे, आयटीआर तुमच्याकडे असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला कमाईची मर्यादा नाही. तशी रोख रक्कम बाळगण्याची भीती नाही.
जर आयकर विभाग तुमच्या उत्तरावर समाधानी नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचे साधन कोणते आणि उत्पन्न कुठून मिळविले याचे उत्तर द्यावे लागेल. त्यासाठीची कागदपत्रे सादर करावी लागतील. पण दस्ताऐवजात गडबड दिसून आली तर मात्र तुम्हाला दंडाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
कागदपत्रांत सुसूत्रता नसेल आणि अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. गडबड आढळली तर नियमांचे उल्लंघन केले म्हणून तुम्हाला एकूण उत्पन्नावर 137 टक्के कर मोजावा लागेल. ही रक्कम फार मोठी असली तरी ती जमा करावी लागेल.
जर तुम्ही बँकेत वार्षिक 20 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागते. जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर तुमच्यावर दंड लावण्यात येईल.
एका वर्षात 1 कोटींचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला 2 टक्के टीडीएस द्यावा लागेल. एका दिवसात बँकेतून 50 हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी कॅश काढत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड दाखवाने लागेल.
जर तुम्ही 30 लाख रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता थेट रोखीत खरेदी केली, तर तुम्हाला त्याविषयीच्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेत. 2 लाख रुपयांवरील खरेदी केवळ कॅशनेच करता येत नाही.