नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : जगभरात बिअर, वाईन, रम आणि इतर दारुचे (Liquor) चाहते कमी नाहीत. त्यातच देशी भिंगरी, संत्रा आणिक काय काय ब्रँडचे अनेक तळीराम चाहते आहेत. बिअरचा असाच एक जगप्रसिद्ध ब्रँड आहे. त्याची चव अनेकांनी चाखली आहे. तर हा ब्रँड किरकोळ किंमतीला विक्री होत आहे, त्याचीच सध्या जगभर चर्चा सुरु आहे. या जगप्रसिद्ध दारु कंपनीची अगदी स्वस्तात विक्री झाली आहे. रशियातून (Russia) या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. पण या कंपनीचा इतकी मोठी उलाढाल असताना या कंपनीने रशियातील कंपनी कवडीमोल किंमतीला विक्री केली आहे. हा व्यवहार अगदी काहीशेचा पण नाही. यामध्ये एक पिझ्झा आरामात घेऊन खाता येईल, इतक्या स्वस्तात ही विक्री झाली आहे.
इतक्या स्वस्तात विक्री
नेदरलँडचा जगप्रसिद्ध ब्रँड हेनकेन (Heineken) सगळ्यांनाच माहिती आहे. बिअर प्रेमींमध्ये हा ब्रँड विशेष आहे. या कंपनीने रशियातून गाशा गुंडाळला आहे. रशियातील कंपनीची उलाढाल 2600 कोटींच्या घरात आहे. या कंपनीची अवघ्या 90 रुपयांना विक्री करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षापासून रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्ह नाहीत. दोन्ही देशांची लढाई सुरुच आहे. त्यात हेनकेन कंपनीला जवळपास 300 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले आहे. भारतीय रुपयात कंपनीला जवळपास 26 अब्ज 80 कोटी रुपयांचा फटका बसला. त्यामुळेच या कंपनीने अर्नेस्ट ग्रुपमधून बाहेर पडण्याची पूर्ण तयारी केली आहे.
कंपनी विक्रीची कारणे काय
आता इतका मोठा कारभार असणाऱ्या कंपनीने त्यांचा रशियातील व्यापार इतक्या स्वस्तात, अवघ्या 90 रुपयांत का विक्री केला असा सवाल विचारण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टसनुसार रशिया आणि युक्रेन युद्धाने हेनकेन कंपनीने रशिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका युरोत हा व्यवहार पूर्ण झाला आहे. या उलाढालीतून कंपनीने एकप्रकारे दोन्ही देशांना निषेधाचा सूरच आळवला आहे.
कर्मचाऱ्यांचे काय
या निर्णयामुळे हेनकेन कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. कंपनीचे सीईओ डॉल्फ वॅन डेन ब्रिंक यांनी कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचे सांगितले. रशियात कंपनीचे 1800 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुढील तीन वर्षे कंपनी सांभाळणार आहे.
अनेक कंपन्या रशियातून बाहेर
रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाला पण मोठे नुकसान होत आहे. हेनकेन प्रमाणेच अनेक कंपन्यांनी रशियाच्या युद्धनीतीचा निषेध म्हणून प्रकल्प विक्रीचा सपाटा लावला आहे. युक्रेनवरील आक्रमणाविरोधात अनेक कंपन्यांनी निषेध नोंदवत, रशियातून काढता पाय घेतला आहे. पश्चिमी देशांनी रशियावर प्रतिबंध लावला आहे.