निवडणुकीच्या काळात पैसाच पैसा; गुंतवणूकदारांच्या खिशात 26 लाख कोटींच्या नोटा

| Updated on: May 28, 2024 | 2:38 PM

Share Market : लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 3500 अंकांपर्यंत उसळला आहे. सोमवारी सेन्सेक्सने 76000 अंकांचा टप्पा पार केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना या कालावधीत 26 लाख कोटींचा फायदा झाला आहे.

निवडणुकीच्या काळात पैसाच पैसा; गुंतवणूकदारांच्या खिशात 26 लाख कोटींच्या नोटा
शेअर बाजारामुळे कमाईच कमाई
Follow us on

जेव्हापासून लोकसभा निवडणुकीचा बार उडाला आहे, तेव्हापासून शेअर बाजारात मोठा उलटफेर दिसून आला. बाजारात चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी सकाळी शेअर बाजारात 500 हून अधिक अंकांची तेजी दिसली. बीएसई सेन्सेक्सने 76 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. नंतर व्यापारी सत्राअखेरीस त्यात जवळपास 20 अंकांची घसरण दिसली. निवडणुकीच्या या रणधुमाळीत मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्सने 3500 अंकांची उसळी घेतली. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा खिसा 26 लाख कोटी रुपयांनी भरला. गुंतवणूकदार मालामाल झाला.

BSE मध्ये 3500 हून अधिक अंकांची तेजी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या सत्राची सुरुवात 19 एप्रिल रोजी झाली. त्यादिवशी मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 71,816.46 अंकांपेक्षा खालच्या स्तरावर होता. तर सोमवारी शेअर बाजार 75,390.50 अंकांवर बंद झाला. याचा अर्थ यादरम्यान सेन्सेक्समध्ये 3,574 अंकांची तेजी दिसली. या काळात सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना जवळपास 5 टक्के रिटर्न दिला आहे. सोमवारी सेन्सेक्स 76000 अंकांसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. इंट्रा डेमध्ये सेन्सेक्समध्ये 500 अंकांहून अधिकची तेजी दिसली. बाजार बंद होताना त्यात 20 अंकांची मामूली घसरण झाली.

हे सुद्धा वाचा

NSE मध्ये तेजीचे सत्र

तर लोकसभा निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात गुंतवणूकदारांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजने मोठा फायदा मिळवून दिला. 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना रोजी निफ्टी 21,777.65 अंकांसह खालच्या पातळीवर ट्रेड करत होता. त्यानंतर त्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 27 मे रोजी निफ्टी 22,932.45 अंकांवर बंद झाला. या दरम्यान निफ्टीत जवळपास 1155 अंकांची तेजी दिसून आली. सोमवारी निफ्टी 23,110.80 अंकांसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचली. त्यानंतर त्यात पडझड दिसली.

गुंतवणूकदारांच्या खिशात 26 लाख कोटी जमा

लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाल्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या खिशात 26 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. BSE च्या आकडेवारीनुसार, 19 एप्रिल रोजी बाजार बंद झाला, त्यादिवशी बीएसईचे मार्केट कॅप 3,93,45,528.92 कोटी रुपये होते. तर 27 मे रोजी बाजारातील भांडवल 4,19,95,493.34 कोटी रुपयांपर्यंत वाढले. बीएसई मार्केट कॅपमध्ये या दरम्यान 26.50 लाख कोटींची वाढ नोंदविण्यात आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदार मालामाल झाले. त्यांना एकाच महिन्यात लॉटरी लागली आहे.