नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात दीर्घ लांबीचं (Longest Budget Speech Nirmala Sitharaman) ठरलं आहे. सीतारमण यांनी तब्बल 159 मिनिटांचं म्हणजेच दोन तास 39 मिनिटांचं भाषण केलं. विशेष म्हणजे सीतारमण यांनी गेल्या वर्षी रचलेला स्वतःचाच विक्रम मोडित काढला.
विशेष म्हणजे, तब्येत बिघडल्यामुळे सीतारमण भाषण पूर्ण करु शकल्या नाहीत. त्यांना ते मध्येच आटपावं लागलं, अन्यथा ते आणखी काही काळ चाललं असतं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भाषण थांबवण्यास सुचवलं, तेव्हा भाषण थांबवताना त्या शेवटची दोन पानं बाकी राहिल्याचं म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांनी केलेलं भाषण 13 हजार 275 शब्दांचं होतं.
गेल्या वर्षी म्हणजेच 5 जुलै 2019 रोजी सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिलं अर्थसंकल्पीय भाषण सादर केलं होतं. ते भाषण 135 मिनिटं म्हणजेच दोन तास 15 मिनिटं लांबीचं होतं. तेव्हा निर्मला सीतारमण यांनी 16 वर्ष जुना विक्रम मोडला होता.
माजी अर्थमंत्री जसवंत सिंग यांच्या नावावर तोपर्यंत सर्वाधिक लांबीचं अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा रेकॉर्ड होता. जसवंत सिंग यांनी 2003 मध्ये अर्थमंत्रिपदी असताना लोकसभेत 133 मिनिटं म्हणजेच दोन तास 13 मिनिटं अर्थसंकल्प सादर केला होता.
सर्वाधिक शब्दांचं भाषण
सर्वाधिक शब्द असलेल्या भाषणाचा विचार केला, तर तो विक्रम माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर जमा आहे. 1991 मध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रिपदी असताना 18 हजार 177 शब्दांत अर्थसंकल्प सादर केला होता.
2014 मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं पहिलं बजेट सादर केलं होतं. हे बजेट अरुण जेटली यांना 130 मिनिटात सादर केलं होतं. 1977 मध्ये एचएम पटेल यांनी अंतरिम बजेट सादर करताना 800 शब्दांचं सर्वात छोटं बजेट भाषण केलं होतं.
Our youth want jobs. Instead they got the longest budget speech in parliamentary history that said absolutely nothing of consequence.
PM & FM both looked like they have absolutely no clue what to do next.
#Budget2020 pic.twitter.com/5oUCs8rp32
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2020
सर्वाधिक वेळा बजेट मांडणारे अर्थमंत्री
मोरारजी देसाई यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सर्वाधिक म्हणजे दहा वेळा सादर केला होता. मोरारजी देसाई हे जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक आहे पी चिदंबरम यांचा. चिदंबरम यांनी संसदेत 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्रिपदी असताना संसदेत 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला.
1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या. मात्र निर्मला सीतारमन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सीडी देशमुख यांनी प्रत्येकी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला. डॉ. मनमोहनसिंग यांना सहा वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 वेळा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.
राजीव गांधींचा आगळा-वेगळा विक्रम
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्ही. पी. सिंग यांच्या पक्षातून फुटल्यानंतर 1988-89 चा अर्थसंकल्प सादर केला. अशाप्रकारे आई आणि आजोबांनंतर अर्थसंकल्प सादर करणारे ते तिसरे पंतप्रधान ठरले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 6 अर्थसंकल्प सादर केले. मात्र पंतप्रधानपदी असताना त्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही. हे काम त्यांनी आपल्या अर्थमंत्र्यांकडे सोपवले होते. मात्र 10 वर्ष पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांची छाप बजेटवर पडलेली असायची.
Longest Budget Speech Nirmala Sitharaman