मुंबई : देशासह अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. बँक, त्याच्या विविध शाखा, बँकेतील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येत आहेत. त्यामुळे बँका बंद करणे शक्य नाही. पण बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व ग्राहकांनी त्यांची कामे ऑनलाईन किंवा अॅपद्वारे करावी, असे आवाहन केले आहे. (Many Banks Provide service via digital mode)
याबाबत भारतीय बँक असोसिएशनने (IBA) बुधवारी सर्व बँक प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत देशभरातील बँकांना एकत्र लागू होईल, असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण त्याऐवजी बँकेच्या सर्व शाखांमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवठा जातील, याचा निर्णय राज्यस्तरीय बँकिंग समितीद्वारे (SLBC) घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
इंडियन बँक असोसिएशनच्या बैठकीत सहभागी झालेल्या एका बँकेतील अधिकाऱ्यानुसार, सध्या बऱ्याच ग्राहकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडे डिजीटल पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना बँक स्टेटमेंट, अकाऊंट बॅलन्ससह इतर सर्व माहिती एक क्लिकवर मिळू लागली आहे. त्यामुळे कोरोना काळात ग्राहकांनी बँकेत न जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
इंडियन बँक असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच आतापर्यंत 600 हून अधिक बँक कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मात्र बँका या अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याने त्याचे कामकाज चालू ठेवणे बंधनकारक आहे.
सध्या ग्राहकांना मिस कॉल बँकिंग, व्हॉट्सअॅप बँकिंग, मोबाईल अॅप आणि एटीएमसारख्या अनेक प्रकारच्या बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची संधी आहे. यामुळे तुमचा बँक किंवा त्यातील कर्मचाऱ्यांशी संबंध येणार नाही. तसेच तुम्हाला त्यांना वारंवार भेटावेही लागणार नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका टळू शकतो.
वृद्धांसाठी खास सुविधा
अनेक वृद्धांकडे स्मार्टफोन नसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी बँकेने Door step banking चा पर्याय दिला आहे. यात वृद्ध ग्राहकांना बँकेकडून खास सुविधा दिली जाते. ज्यात रोख रक्कम काढण्यापासून पैसे डिपॉझिट करण्यापर्यंत सर्व सुविधा तुम्हाला घरबसल्या मिळतात. यासाठी तुम्हाला फक्त बँकेला एक फोन करावा लागतो.
कोरोनामुळे बहुतांश सेवेत घट
गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक बँकांनी त्यांच्या बहुतांश सेवा कमी केल्या होत्या. त्यामुळे फार कमी ग्राहक बँकांच्या शाखेत कामासाठी दाखल झाले होते. HDFC या बँकेने गेल्यावर्षी 2020 मध्ये कामकाजाचा वेळ कमी केला होता. तसेच परदेशी चलनाची विक्रीही बंद केली होती. तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात नवीन खाते उघडणे, रोख रक्कम काढणे, पासबुक प्रिंटींग आणि चलन विनिमय यासारख्या सेवा बंद केल्या होत्या. (Many Banks Provide service via digital mode)
संबंधित बातम्या :
क्रेडिट कार्डावर कर्ज घेताय, मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठा तोटा
अमेरिकेचा मोठा झटका, भारताला ‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं, नेमका काय परिणाम होणार?
पोस्टाच्या ‘या’ योजनेत दररोज 22 रुपये गुंतवा, थेट मिळणार 8 लाखांचा जबरदस्त फायदा