वाशीम | 19 फेब्रुवारी 2024 : आयुष्याला बिब्बा लागणे ही ग्रामीण भागातील म्हण जरी नकारात्मक असली तरी याच काळ्या बहुगुणी बिब्ब्यामुळे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील गांगलवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी महिलांना सकारात्मक मार्ग सापडला आहे. गांगलवाडी आणि कुत्तरडोह येथील आदिवासी महीलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमाने वाशीम जिल्ह्यातील गांगलवाडी येथील आदिवासी महीलांनी गोडंबी व्यवसायात चांगलीच भरारी घेतली आहे.
वाशीम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील अमाणी, गांगलवाडी आणि कुत्तरडोह या गावात बऱ्याचा काळापासून आदिवासी समाजातील महीला काळे बिबे फोडुन गोडंबी ( बिया ) काढण्याचे काम करतात. मात्र कच्चा माल पुरेसा उपलब्ध होत नसल्याने वर्षातील ठराविक ऋतुमध्येच हाताला काम मिळत होते. जंगलातील बिब्बे संपल्यानंतर गोडंबीचे काम इतर काळात बंद राहत असल्याने अनेक महीलांना गाव सोडून कामासाठी बाहेर स्थलांतर करावे लागत होते. मात्र उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गांगलवाडी आणि कुत्तरडोह येथील महीलांनी उन्नती महीला ग्रामसंघ स्थापन करून 16 लाख रूपयांचे कर्ज मिळवले. यातून गोडंबीसाठी लागणारा कच्चा माल खरेदी केला. तसेच बिबे सुकविण्यासाठी ( सुकवनी यंत्र ) सोलर ड्रायर मशीन, साठवणूकीसाठी स्टोअर हाऊस ( गोदाम ) आणि बिबे फोडण्यासाठी गावात शेडची उभारणी देखील करण्यात आली.
आता कच्चा माल आणि इतर भांडवल उपलब्ध झाल्याने महीलांच्या हाताला आता बारमाही काम मिळाले आहे. उमेद अभियान मार्फत मिळालेल्या अर्थसहाय्यातून भांडवल खरेदी केल्याने गोडंबीचे मार्केंटींग करणे सुलभ झाले आहे. आता वाशीम जिल्ह्यासह महाराष्ट्रभर गांगलवाडी आणि कुत्तरडोह येथील गोडंबीला मागणी होत असल्याने येथील महीलांच्या हाताला बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
बिब्बे फोडणे हे काम अत्यंत जोखमीचे असते. यातील तेल आणि चिक डोळ्यात उडून किंवा शरीराला लागून अनेकवेळा महीलांच्या अंगाला जखमा होतात. त्यामुळे लहान मुले घरी असल्याने घरी बिब्बे फोडणे महीला टाळायच्या. आता बिब्बे फोडण्यासाठी स्वतंत्र शेडची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच उमेद अभियान मार्फत त्वचा सरंक्षणासाठी साहित्याचे वितरण देखील करण्यात आले आहे. गावातील सर्व महीला आता सुरक्षितरीत्या बिबे फोडून गोडंबी काढीत आहेत.