नवी दिल्ली | 5 डिसेंबर 2023 : शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी तेजीचे सत्र पाहायला मिळाले. पहिल्यांदा शेअर बाजार 69 हजार अंकांच्या स्तरावर पोहचला. अदानी समूहाच्या शेअर्सनी पण उसळी घेतली. या समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर सध्याच्या घडीला रॉकेट झाले आहेत. आज, मंगळवारी, बाजार उघडताच एका तासात या समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 82 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. एका दिवसापूर्वी अदानी समूहाच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. बाजार बंद होताना मार्केट कॅप जवळपास 73 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचले. या वर्षाच्या सुरुवातीपासून अदानी समूहाची परीक्षा सुरु होती. अमेरिकन प्रशासनाने पण आता अदानी समूहाला एकप्रकारे जीवदान दिले आहे. हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल उपयोगी नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता समूहाला अच्छे दिन आले आहेत.
शेअर बाजार उच्चांकावर
मुंबई स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 481.43 अंकांची तेजी आली. सेन्सेक्स 69,346.55 अंकांवर पोहचला. व्यापारी सत्रात सेन्सेक्सने 69,381.31 अंकांपर्यंतची मजल मारली. हा त्याचा सर्वकालीन उच्चांक आहे. दोन दिवसांच्या सेन्सेक्समध्ये जवळपास 1900 अंकांची वाढ दिसून आली. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. निफ्टीत 76 अंकाची वाढ झाली. निफ्टी 20,762.75 अंकावर पोहचला. निफ्टी व्यापारी सत्रात 20,849.60 अंकांसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचला.
अदानी समूहाचे शेअर रॉकेट
- अदानी इंटरप्रायजेजच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 2776 रुपयांवर व्यापार करत आहे. कंपनीचा शेअर या व्यापारी सत्रात 2825.65 रुपयांवर पोहचला होता. एका तासाच्या व्यापारी सत्रात कंपनीने बाजार भांडवलात 25,129.81 कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
- अदानी पोर्ट अँड एसईझेडच्या शेअरमध्ये जवळपास 10 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा शेअर 2778.05 रुपयांवर व्यापार करत आहे. हा शेअर या व्यापारी सत्रात 2825.65 या उच्चांकावर पोहचला. एका तासात या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 14,937.36 कोटींची वाढ झाली.
- अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 488.50 रुपयांवर व्यापार करत आहे. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 499.80 रुपयांवर पोहचला. एका तासात या कंपनीच्या बाजारातील भांडवलात 10,240.17 कोटी रुपयांची वाढ झाली.
- अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसली. हा शेअर 992.60 रुपयांवर व्यापार करत आहे. तो 1032.15 रुपयांवर पोहचला. एका तासात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 6,475.94 कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
- अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 17 टक्के तेजीसह 1312.20 रुपयांवर व्यापार करत होता. या व्यापारी सत्रात तो 1341.60 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. एका तासात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 25,724.68 कोटी रुपयांची वाढ झाली.
- अदानी टोटल गॅसचा शेअर जवळपास 11 टक्क्यांनी वधारला. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 838.85 रुपयांवर पोहचला. एका तासांच्या व्यापारी सत्रात मार्केट कॅपमध्ये 4,305.75 कोटी रुपयांची वाढ झाली.
- अदानी विल्मरच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 361.35 रुपयांवर व्यापार करत आहे. हा शेअर 370 रुपयांपर्यंत वधारला. एका तासात कंपनीचे मार्केट कॅप 1,982.63 कोटी रुपयांनी वाढले.
- एसीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये जवळपास 5 टक्क्यांची तेजी दिसली. कंपनीचा शेअर 2117 रुपयांवर व्यापार करत आहे. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 2163.10 रुपयांवर पोहचला. एका तासात कंपनीचे मार्केट कॅप 1,905.1 कोटी रुपयांवर पोहचले.