पुणे : नवीन प्रकल्पांच्या (Project) प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकात खोटी किंवा चुकीची माहिती छापणे आता विकसकांना महागात पडणार आहे. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाने आपली फसवणूक झाल्याची किंवा माहितीपत्रकात जी माहिती छापण्यात आली होती, त्यानुसार व्यवहार न झाल्याची तक्रार केल्यास संबंधित विकसकांना (Developer) घर खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज ग्राहकांना द्यावे लागणार आहे. याबाबत नुकतेच महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेट अथॉरिटी ‘महारेरा’ने आदेश जारी केला आहे. महारेराचे सदस्य विजय सतबीर सिंग यांच्याकडून 22 एप्रिल रोजी एका प्रकरणात हा आदेश जारी करण्यात आला आहे. रिअल इस्टेट नियामक कायदा (RERA)च्या कलम 12 अंतर्गत जर विकासकाने प्रसिद्धी पत्रकात खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास संबंधित विकासाला ग्रहकाने घर खरेदी करण्यासाठी भरलेले पैसे परत करावे लागतील, सोबतच व्याज देखील द्यावे लागणार असल्याचे या आदेशता म्हटले आहे.
ज्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे, ते प्रकरण एप्रिल 2017 मधील आहे. एका ग्राहकाने एप्रिल 2017 मध्ये एका फ्लॅटचे बुकिंग केले होते. या प्रकल्पाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकात हा प्रकल्प डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र डिसेंबर 2019 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा खरेदीदारांना सुधारीत तारीख देण्यात आली. 30 जून 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असे सांगण्यात आले. .या प्रकरणात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावणी करताना ‘महारेरा’ने हा आदेश दिला आहे.
एखादा व्यक्ती घर खरेदी करतो, म्हणजे तो आपल्या कष्टाची कमाई त्यामध्ये गुंतवत असतो, त्याची फसवणूक होता कामा नये, विकासकांनी प्रकल्पाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकात कोणतीही चुकीची अथवा अवास्तव माहिती छापून ग्राहकांची दिशाभूल करू नये, तसे आढळल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार मिळाल्यास विकसकांना संबंधित ग्राहकाला घर खरेदी करण्यासाठी दिलेले पैसे परत द्यावे लागतील, सोबतच त्या पैशांवर त्या मुदतीत जे व्याज होईल ते देखील द्यावे लागेल.