नवी दिल्ली : देशातील मोठा उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industry) गेल्या तीन दशकात जोरदार विस्तार केला आहे. अनेक क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा आहे. या समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांच्या उद्योग समूहाचा कारभार मुलांकडे सोपविला आहे. पण रिलायन्सच्या जबाबदारीतून ते पूर्णपणे मुक्त झाले नाहीत. समूहाची सूत्र त्यांच्याकडेच आहेत. आता वयाच्या 65 व्या वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिओने (JIO) पारंपारिक बाजाराला जोरदार हादरे देत जोरदार कामगिरी केली होती. येत्या काही वर्षांत असेच वादळ उद्योग विश्वात येण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांनी त्यांचा व्यवसाय तीन मुलांना वाटून दिले आहेत. मोठा मुलगा आकाश अंबानीकडे (Akash Ambani) टेलिकॉम, मुलगी ईशा अंबानीकडे (Isha Ambani) रिटेल बिझनेस तर लहान मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याच्याकडे रिफाईनिंग आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मुलांकडे व्यवसायाची सूत्र सोपाविल्यानंतर मुकेश अंबानी स्वस्थ बसणार नाहीत. ते आता हरित ऊर्जेसंबंधीच्या व्यवसायात (Green Energy Business) नशीब आजमावणार आहेत. त्यासाठी अंबानी यांनी मोठी योजना आखली आहे.
उद्योजक मुकेश अंबानी यंनी पुढील 15 वर्षांकरीता 75 अरब डॉलरची मोठी गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने 2035 पर्यंत कार्बन नेट-झिरो कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गिगा कारखाने आणि ब्लू हायड्रोजन सुविधा तयार करण्यात येणार आहे. तसेच संपादनातून या कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे.
रिलायन्सने 1990 मध्ये पेट्रोलियम व्यवसायावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतरच्या दशकात या समूहाने देशात टेलिकॉम क्षेत्रात त्सुनामी आणली होती. रिलायन्सचे फिचर फोन आणि डाटा प्लॅनने देशात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर रिटेल, पेट्रोल आणि FMCG उद्योगात रिलायन्स जोरदार कामगिरी बजावत आहे.
रिलायन्सचा या नव्या व्यवसायात अर्थातच अदानी समूहाला (Adani Group) टफ फाईट द्यावी लागणार आहे. अदानी समूहाने अक्षय ऊर्जा (Renewable Energy) व्यवसायासाठी 70 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात दोन्ही समूहांमध्ये या क्षेत्रात चुरस पहायला मिळेल.