Multibagger Share : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला उल्लेख, रॉकेट झाले शेअर, एकाच महिन्यात घेतली भरारी

| Updated on: Sep 07, 2023 | 10:07 AM

Multibagger Share : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची फिरकी घेतली. ज्या सरकारी कंपन्यांच्या कामगिरीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केला, त्यांच्यामध्ये गुंतवणुकीचा डाव खेळला पाहिजे. कारण विरोधक ज्यांना वाईट म्हणतात, त्यांचे चांगलेच होते, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. त्यानंतर जे चित्र आहे, ते सर्वांसमोर आहे.

Multibagger Share : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला उल्लेख, रॉकेट झाले शेअर, एकाच महिन्यात घेतली भरारी
Follow us on

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 10 ऑगस्ट रोजी काही सरकारी कंपन्यांच्या कामगिरी संसदेसमोर मांडली. केंद्र सरकारने, सरकारी कंपन्यांचे वाटोळे केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, हाच धागा पकडून पंतप्रधांनी या सरकारी कंपन्यांचा आलेख मांडला होता. ज्या सरकारी कंपन्यांच्या (Public Sector Undertaking) कामगिरीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केला, त्यांच्यामध्ये गुंतवणुकीचा डाव खेळला पाहिजे, कारण विरोधक ज्या गोष्टीला वाईट म्हणतात, त्याचे कल्याण होते, असा चिमटा पंतप्रधानांनी विरोधकांना काढला होता. आता या वक्तव्याला जवळपास एक महिना होत आला आहे. ज्या कंपन्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला होता. त्यांनी या काळात जोरदार मुसंडी मारली आहे. हे शेअर (Share) रॉकेट झाले आहे. त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. या शेअरने जवळपास 40 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

कोणत्या आहेत या सरकारी कंपन्या

  1. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) : या कंपनीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदाहरण दिले होते. संरक्षण क्षेत्रातील या सरकारी कंपनीने तडाखेबंद कामगिरी केली. या शेअरचा भाव 10 ऑगस्ट रोजी 3,791 रुपये होता. 6 सप्टेंबर रोजी हा शेअर 3,973 रुपयांवर पोहचला. एका महिन्याच्या आतच या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेजी दिसली. एका वर्षात या शेअरने 66 टक्क्यांचा परतावा दिला.
  2. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock) : संरक्षण क्षेत्राशी निगडीत या सरकारी कंपनीची जोरदार घौडदौड सुरु आहे. 10 ऑगस्ट रोजी या कंपनीचा शेअर 1,794 रुपये होता. तो वधारुन 1,907 रुपयांवर पोहचला. संसदेसमोर मोदींनी या कंपनीचा उल्लेख केला होता. एका महिन्यातच हा शेअर 7 टक्क्यांच्या जवळपास वधारला. तर एका वर्षांत 400 टक्क्यांची आघाडी घेतली.
  3. हे सुद्धा वाचा
  4. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) : या सरकारी कंपनीने केवळ एका महिन्यात 43 टक्क्यांचा परतावा दिला. या ही कंपनीचा मोदी यांनी उल्लेख केला होता. 25 दिवसांत या शेअरची किंमत 100 रुपयांच्या जवळपास होती, आता हा शेअर 143.50 रुपयांना आहे.
  5. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड (IRFC) : रेल्वेसंबंधी ही सरकारी कंपनी परतावा देण्यात मागे नाही. 10 ऑगस्ट रोजी या कंपनीचा शेअर 50 रुपयांच्या जवळपास होता. गेल्या एका महिन्याच्या आत हा शेअर 69 रुपयांच्या घरात पोहचला. या शेअरने 38 टक्क्यांचा परतावा दिला. एका वर्षात हा शेअर 208 टक्क्यांनी वधारला.
  6. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) : रेल्वेशी संबंधी सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. या कंपनीचा शेअर 10 ऑगस्ट रोजी 126.60 रुपये होती. आता हा शेअर 150.25 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एका वर्षात या शेअरने 356 टक्के परतावा दिला.
  7. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RCIL) : या सरकारी रेल्वे कंपनीने लांब पल्ला गाठला. 25 दिवसांत या कंपनीचा शेअर 29 टक्क्यांनी वधारला. 10 ऑगस्ट रोजी हा शेअर 171 रुपयांवर होता, तो आता 223.20 रुपयांवर पोहचला. एकाच वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला.
  8. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) : एलआयसीच्या गुंतवणुकीवर विरोधकांनी सर्वाधिक आगपाखड केली होती. अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. एलआयसीने गेल्या 25 दिवसांत 7 टक्के परतावा दिला आहे. एलआयसीचा शेअर 641 रुपयांवर होता. तो आता 682 रुपयांवर पोहचला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.