नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : बाजारात या आठवड्यात पडझडीचे सत्र दिसून आले. दिग्गज स्टॉकना कमाल दाखवता आली नाही. पण बाजारातील छोटूराम शेअरने (Share Market) जोरदार कामगिरी केली. घसरणीच्या सत्रात हे स्टॉक सूसाट धावले. पेनी शेअर, कमी किंमतीच्या काही शेअर्सनी धमाल उडवून दिली. इन्ट्राडे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत या शेअर्सनी तुफान कमाई करुन दिली. सरकारी बँकेचा हा शेअर पण त्यातीलच एक, त्याने जोरदार कामगिरी केली. हा शेअर शुक्रवारच्या व्यापारी सत्रात 8.40 टक्क्यांनी वधारला. या शेअरची किंमत 50.86 रुपये आहे. तो या किंमतीवर बंद झाला. हा मल्टिबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यात 111.92 टक्के चढला. या तेजीच्या सत्रामुळे या सरकारी बँकेचे (PSU Bank) बाजारातील मूल्य वाढले. मार्केट कॅप 44,151.26 कोटी रुपये झाले.
शुक्रवारी घेतली झेप
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअरवर सध्या गुंतवणूकदार फिदा आहेत. शुक्रवारी हा शेअर बीएसई इंडेक्सवर 47.88 रुपयांवर उघडला. इंट्राडे ट्रेड दरम्यान हा शेअर 51.70 रुपयांवर पोहचला. इंट्राडे ट्रेडमध्ये या शेअरचा निच्चांक 47.30 रुपये होता. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी गेल्या 52 आठवड्यात 55.99 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. बँकेचा 52 आठवड्यातील निच्चांक 18.65 रुपये आहे. इतर सरकारी बँकांची कामगिरी पण चांगली सुधारली आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी बँकांनी चांगली आघाडी उघडली आहे.
नफ्यात जोरदार वाढ
चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा 78 टक्के वाढला. बँकेला 418 कोटी रुपयांचा फायदा झाला. बँकेने याविषयीची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. त्यानुसार, कर्ज कमी झाल्याने आणि व्याजातून झालेल्या कमाईमुळे बँक फायद्यात राहिली. गेल्यावर्षी याच कालावधी दरम्यान बँकेला 235 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. एप्रिल-जून या तिमाहीत बँकेचा एकूण महसूल 8,184 कोटी रुपये झाला. तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत बँकेला 6,357 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.