22 जुलैला भारतीय म्युच्युअल फंड (Mutual fund) विश्वातील दिग्गज फंड मॅनेजर प्रशांत जैन (Prashant Jain) यांनी HDFC AMC च्या चीफ इन्व्हेस्टमेंट (investment) ऑफिसर पदाचा राजीनामा दिला आहे. ही मोठी घटना आहे. आता HDFC म्युच्युअल फंडाचं नेतृत्व नवीन कर्णधार करणार आहेत. फंड मॅनेजर बदलण्याची घटना याआधी AXIS म्युच्युअल फंडमध्येही झाली होती. मात्र, त्यामागे वेगळं कारण होतं. फ्रंट रनिंगमुळे AXIS बँकेने आपल्या दोन फंड मॅनेजरांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे बरेच गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले होते. तसेच फंड मॅनेजर बदलला तर काय करावं ? हा प्रश्न त्यांच्यासमोर ऊभा राहिला. तुम्हालाही तोच प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊ अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी काय कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. दोन प्रकरणात फंड मॅनजेर बदलतो. चांगल्या करिअरसाठी फंड मॅनेजर दुसऱ्या फंड हाऊसमध्ये जातो. तर दुसरं म्हणजे कामगिरी चांगली नसल्यानं फंड मॅनेजरला राजीनामा द्यावा लागतो. अशा परिस्थितीत घाबरून न जाता मॅनेजर बदलल्याने फंडात कोणत्या प्रकारे बदल होत आहेत यावर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.
एखाद्या वाईट घटनेमुळे फंड मॅनेजरने पद सोडलं असल्यास अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावं?.अशावेळी फंडातून बाहेर पडण्यापूर्वी पुढील सहा ते आठ महिन्यांपर्यंत नव्या फंड मॅनेजरची कामगिरी कशी आहे याकडे लक्ष द्यावे.मोठ्या फंड हाऊस आणि AMC मध्ये एक प्रक्रिया स्वीकारली जाते. फंड मॅनेजमेंटसाठी एक टीम असते, ते वेगवेगळ्या स्टॉकवर रिसर्च करतात. यासाठी गुंतवणूकदारांनी येणाऱ्या 8 ते 12 महिन्यापर्यंत बाजारातील चढ उतारात फंडाचे प्रदर्शन बघण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घ्यावी.असा सल्ला असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इनव्हेस्टमेंट अॅडव्हायज समितीचे सदस्य दिलशाद बिलमोरिया यांनी दिला आहे.तसेच गुंतवणुकदारांनी आपल्या स्कीमची रँकिंग घसरली आहे का ? आणि जर घसरली असेल तर किती घसरली आहे यावर लक्ष द्यावे.याचप्रमाणे बेंचमार्कनुसार रँकिंगमध्ये किती बदल झाला आहे हे देखील पहावे.
एखाद्या फंडात टर्नओव्हर रेशो अचानक वाढताना दिसला तर नवीन मॅनेजर पोर्टफोलियोमध्ये मोठा बदल करत असल्याचं द्योतक आहे. यामुळे स्कीमच्या रिटर्नमध्ये किंवा रिस्क प्रोफाईलमध्ये बदल होऊ शकतो. नवीन मॅनेजर फंडात बदल करत असेल तर यासाठी स्कीमच्या मार्केट कॅप संरचनेकडे बघा.मिड किंवा स्मॉल कॅप शेअरमध्ये आलेले जास्त वेटेज म्हणजे जोखीम आणि चढ-उतार जास्त असतो. जर लार्ज कॅपपासून मिड किंवा स्मॉल कॅपमध्ये बदल होत असल्यास मॅनेजरला जुनी रणनिती आवडली नाही असे समजावे.फंड मॅनेजरची फंड व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका असल्यानं फंडाच्या कामगिरीला तो जबाबदार असतो. परंतु फंडाचं व्यवस्थापन करणाऱ्या टीमची गुंतवणुकीची प्रक्रिया कशी आहे यावर लक्ष दिलं पाहिजे. तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी गुंतवणुकीची प्रक्रिया, फंड हाऊसची प्रतिष्ठा, मॅनेजरला बाहेर काढल्यानंतर फंडाला सांभाळण्याची क्षमता आणि फंड मॅनेज करणारी टीमची क्षमता याचा विचार केला पाहिजे.या सर्व बाबींवर विचार करुनच फंडातून बाहेर पडण्याचा विचार करावा. असे Epsilon Money चे Co-Founder आणि CEO अभिषेक देव सांगतात.