सध्या देशात NEET परीक्षेवरुन वादंग सुरु आहे. त्यावर सुप्रीम तोडगा पण निघाला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली. नीटच्या 1,563 उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदिप मेहता यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली होती. ही सर्वोच्च लढाई अलख पांडे यांनी लढली. त्यांची फिजिक्सवाला ही एडटेक कंपनी संपूर्ण देशात नावाजलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती 2,000 कोटी रुपयांच्या घरात आहे.
एका आयडियाने केली कमाल
वर्ष 2014 मध्ये अलाहाबादमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील अलख पांडे हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. त्यांनी अचानक शिक्षणाला रामराम ठोकला. त्यानंतर प्रयागराज येथे कोचिंग क्लास चालवला. त्यांची शिकविण्याची पद्धत हटके होती. अलख यांना फिजिक्समध्ये अत्यंत आवड होती. विद्यार्थ्यांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर अलखने मोठी भरारी घेण्याचा निर्णय घेतला. ही आयडियाच त्यांना पावली.
फिजिक्सवाला अलख
2015 मध्ये अलख पांडे यांनी युट्यूब चॅनल सुरु केले. त्याचे नाव फिजिक्सवाला अलख असे ठेवले. त्याच नावाने एक फेसबुक पेज पण सुरु केले. 2016 मध्ये त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ शेअर केले. सुरुवातीला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 2017 मध्ये मात्र फरक दिसला. देशात स्वस्त 4G इंटरनेट सेवा सुरु झाली. तर अलख यांनी रणनीती बदलवली. त्याचा फायदा दिसला. 2018 मध्ये युट्यूबने त्यांना पहिला 8 हजारांचा धनादेश पाठवला. त्यावेळी त्यांच्या चॅनलचे जवळपास 50 हजार सब्सक्राईबर होते. त्यांनी कोचिंगची नोकरी सोडण्याचा निश्चिय केला.
2000 कोटींची संपत्ती
त्यांची फिजिक्सवाला ही एक युनिकॉर्न कंपनी झाली. कोरोना काळात 2020 मध्ये अलख युट्यूबवर मोफत क्लास घेत होते. त्यांच्या कमाईचे एकमेव साधन युट्यूबच होते. मार्च 2020 मध्ये कोरोनाने एडटेकसाठी नवीन संधीचा दरवाजा उघडला. त्यांच्या कंपनीची उलाढाला पाहता पाहता 9000 कोटी रुपयांच्या घरात पोहचली. तर त्यांची कमाई 2000 कोटींच्या घरात गेली.