मुंबई : कारमधील सहा एयर बॅगचा (Air bag) मुद्दा निकाली निघाला नसतानाच सरकारनं ऑटो क्षेत्रावर आणखी एक बंधन लादलंय. वीज उपकरणांप्रमाणेच आता कारला सुद्धा स्टार रेटिंग असणार आहे. म्हणजेच स्टार रेटिंग असणाऱ्या कार बाजारात येणार आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत मसुदा जारी केलाय. या रेटिंगचा परिणाम कारच्या सुरक्षेवर होणार आहे. नवीन टेस्टिंग प्रोटोकॉलला ‘भारत NCAP’म्हणजेच भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचं नाव देण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहक आनंदी आहेत. मात्र, अडचणीत सापडलेल्या ऑटो क्षेत्रासमोर आणखी एक आव्हान उभं राहितलंय. या निर्णयाचा परिणाम ग्राहक म्हणून तुमच्यावरही पडणार आहे. ऑटो (Auto) क्षेत्राला सध्या कमी मागणी, चिप्सची कमतरता आणि महाग कच्चा मालाचा सामना करावा लागत आहे. त्यातच सरकारकडून सतत कंप्लायंन्सचं ओझं वाढतंय. येत्या तीन महिन्यानंतर म्हणजेच एक ऑक्टोबरपासून प्रत्येक कारमध्ये सहा एअर बॅग्स अनिवार्य करण्यात आल्या आहेत. कंपनी एअर बॅग्सचा प्रश्न सोडवत असतानाचा आता स्टार रेटिंगचा मुद्दा समोर आलाय.
सहा एअरबॅग्स आणि स्टार रेटिंगमुळे कारच्या किंमती वाढू शकतात. म्हणजेच मागणी कमी होण्याचा धोका आहे. लहान कारची निर्मिती करणं हे फायदेशीर राहणार नाही, असं देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारूतीचं म्हणणं आहे. त्यामुळे मारूती लहान कारची निर्मिती थांबवू शकते. ग्राहकांनी सांगितल्यास कंपनी भारत NCAP लागू करू शकते असं मारूतीनं म्हटलंय. वाढत्या महागाईमुळे स्वस्त कार खरेदी करणारा ग्राहक दुरावलाय. आता ऑटो क्षेत्राची नजर मुख्यत: युटिलिटी वाहनं आणि प्रीमियम कारच्या विक्रीवर अवलंबून आहे. मात्र, इथंही परिस्थिती ठीक नाही.
प्रश्न सेमीकंडक्टरच्या टंचाईचा आहे. त्यामुळेच महिंद्रा XUV7OO चा वेटिंग पीरियड तब्बल एक वर्ष आहे. अशीच परिस्थिती इतर कारबाबत सुद्धा आहे. टाटा मोर्टर्सनं एक जुलैपासून कमर्शियल वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसानंतर कारच्या किंमतीही वाढू शकतात. स्टीलच्या किमती कमी होत असताना कारच्या किंमती वाढत आहेत. कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेटिंग पीरियड आणि वाढलेली किंमत या दुहेरी प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच ऑटो उद्योग आणि ग्राहकांसमोर नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत.