Old Tax Regime Vs New Tax Regime : देशात सध्या दोन कर प्रणाली आहेत. एक नवीन आणि दुसरी जुनी. वर्ष 2020 मध्ये केंद्र सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली होती. पण अजूनही लाखो करदाते जुन्याच कर प्रणालीला महत्व देतात असे चित्र आहे. भारतात एकूण 8.18 कोटींहून अधिक करदाते आहेत. त्यामध्ये सध्या 85 टक्के करदात्यांनी जुनी कर प्रणालीद्वारे आयकर जमा केला आहे. तर चालू सत्रात 66 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडली आहे. मग तुमच्यासाठी कोणती कर प्रणाली योग्य आहे?
कराचे गणित मांडा
तुमच्यासाठी कोणती कर प्रणाली योग्य राहील हे समजण्यासाठी अगोदर कराचे गणित मांडा. दोन्ही कर प्रणालीत कोणत्या सवलती मिळतात. कुठे कर कपातीचा फायदा मिळू शकतो, याचे गणित समोर ठेवा. अनेकजण अजूनही किरायाच्या घरात राहतात. अनेक नोकरदारांचा पीएफ कपात होतो. अनेकांकडे आता आरोग्य विमा आहे. मुलांच्या शिकवणी शुल्क, ट्यूशन फी अनेक जण देतात. अनेकांचे गृहकर्जाचे हप्ते सुरू आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे डिडक्शन, कपात सुरू आहे. या सर्वांचा विचार करुन तुम्हाला योग्य ती कर प्रणाली निवडावी लागेल.
नवीन कर प्रणालीकडे पण ओढा
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार, करदाते आता मोठ्या प्रमाणावर नवीन कर प्रणालीकडे वळाले आहेत. त्यातील अनेकांनी जुन्या कर प्रणालीला रामराम ठोकला आहे. चालू सत्रामध्ये जे आयकर रिटर्न (ITR) दाखल झाले आहेत. त्यातील 66 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडली आहे.
1 लाख पगारासाठी कोणती कर प्रणाली योग्य?
महिन्याला 1 लाख पगार असेल तर नवीन कर प्रणाली की जुनी कर प्रणाली योग्य राहिल, असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला एक लाख रुपयाचा पगार असेल आणि एक पण रुपया कर भरायचा नसेल तर करदात्यांना जुनी कर प्रणाली निवडावी लागेल. त्यासाठी तुम्हाला मात्र गृहकर्ज, मेडिक्लेम पॉलिसी आणि इतर काही कर सवलतीच्या गुंतवणूक योजना माहिती असणे आवश्यक आहे.