नवी दिल्ली : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये (December) केवळ कॅलेंडरचे पान बदलणार नाही तर काही बदल ही तुमच्या खिशावर परिणाम करतील. केंद्र सरकारच्या (Central Government) काही नियमांमुळे तुम्हाला नवीन सुविधा मिळतील. तर घरगुती गॅसच्या (Gas Cylinder) किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबर रोजी याविषयीचा निर्णय समोर येईल. नवीन नियमांमुळे तुमच्या खिशावर भार पडू शकतो.
सध्या सायबर फ्रॉडच्या घटना वाढत आहे. त्यामुळे बँका कडक पाऊले टाकत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानचाही वापर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजपासून एटीएममधून पैसा काढण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागणार आहे.
1 डिसेंबरपासून ग्राहकांना एटीएममधून रक्कम काढायची असेल तर ओटीपी टाकल्याशिवाय रक्कम निघणार नाही. पंजाब नॅशनल बँकेच्या डेबिट कार्डधारकांना आता ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय रक्कम काढता येणार नाही.
पीएनबी नंतर आता अनेक बँका हे पॅटर्न राबविण्याचा विचार करत आहे. सध्या काही बँका 10000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम एटीएममधून काढण्यासाठी ओटीपीची पद्धत वापरतात. आता पीएनबीने प्रत्येक व्यवहारासाठी ओटीपी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस वितरण कंपन्या गॅसच्या किंमतींविषयी निर्णय घेतात. गेल्या दोन महिन्यांपासून व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. परंतु, घरगुती गॅसच्या किंमतीत कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
यावेळी घरगुती गॅस धारकांना गॅस सिलेंडर स्वस्त मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याविषयीचा निर्णय कंपन्या जाहीर करतील. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर कमी झाल्याने यावेळी तरी ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी चर्चा आहे.
डिसेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश आहे. याच महिन्यात नाताळ आणि वर्षाच्या शेवटचा दिवस 31 डिसेंबर येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक 1 डिसेंबरपासून डिजिटल रुपयाचा पायलट प्रकल्प राबवित आहे. डिजिटल रुपया मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु आणि भुवनेश्वर येथे सुरु होईल. SBI, ICICI Bank, Yes Bank आणि IDFC First Bank या बँका डिजिटल रुपयाच्या प्रकल्पात सहभागी होतील.
या डिजिटल रुपयाला आरबीआय नियंत्रीत करेल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही दुकानातून किराणा, दाळी, दूध वा इतर वस्तू खरेदी करता येईल. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वास्तविक ब्लॉकचेन सहित अन्य तंत्रज्ञानावर (Blockchain Technology) आधारीत चलन आहे.