नवी दिल्ली : देशात नाईके, अदिदास, टिंबरलँड आणि न्यू बँलेन्स सारखे आंतरराष्ट्रीय शूज ब्रँड (International Shoes Brand) आता भारतातच निर्मिती सुरु करणार आहेत. तैवान देशातील कंपनी हे ब्रँड्स तयार करते. ही कंपनी भारतात कारखाना टाकणार आहे. त्यातून या सर्व जगविख्यात ब्रँड्च्या शूजची (Footwear Brands) निर्मिती देशातच होईल. त्यामाध्यमातून देशात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ही कंपनी तामिळनाडू राज्यात त्यांची फॅक्टरी सुरु करणार आहे. आता सर्व ब्रँड्सवर ‘मेड इन इंडिया’ हा टॅग लागेल. यामाध्यमातून भारतीय तरुणांच्या हाताला रोजगार तर मिळणारच आहे. पण हे शूज येथेच तयार होणार असल्याने ते स्वस्तात ही मिळतील.
या कंपनीची गुंतवणूक
तैवानची कंपनी ‘पोऊ शेन’ ही ब्रँडेड शूज तयार करणारी जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी भारतात 28.08 कोटी डॉलरची (जवळपास 2,302 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. तामिळनाडूमध्ये ही कंपनी फॅक्टरी उभारणार आहे. भारतात नाईके आणि अदिदास शूज या दोन्ही ब्रँड्सला मोठी मागणी आहे. या जागतिक ब्रँडचे शूज देशातच तयार होणार असल्याने भारीतील भारी बूट, शूज आता स्वस्तात मिळेल.
इतक्या नोकरी होतील उपलब्ध
‘पोऊ शेन’ ही ब्रँडेड शूज तयार करणारी कंपनी जगभरात शूजची निर्यात करते. 2022 मध्ये या कंपनीने 27.2 कोटी रुपयांच्या शूजची निर्यात केली. आता ही कंपनी तामिळनाडूमध्ये फॅक्टरी सुरु करत आहे. त्यामाध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या नवीन फॅक्टरीमुळे राज्यात 20,000 नोकऱ्या तयार होतील. तर देशात कच्चा माल, मार्केटिंग, निर्यात या माध्यमातून पूरक व्यवसाय आणि नोकऱ्या तयार होतील. या नोकऱ्या येत्या 12 वर्षांत तयार होतील.
1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक
‘पोऊ शेन’चे उपाध्यक्ष जॉर्ज लियू यांनी सांगितले की, भारतात अजून गुंतवणूक येणार आहे. हा प्रकल्प त्यातील पहिला टप्पा आहे. रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, राज्यात यापूर्वी तैवान येथील हॉन्ग फू ग्रुपने 1,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली होती. ही कंपनी पण राज्यात फुटवेअर तयार करणार आहे.
45% फुटवेअरची निर्यात
भारतातूनही जगभर शूजची निर्यात होते. त्यापैकी 45% हिस्सा एकट्या तामिळनाडू राज्याचा आहे. गेल्या 5 वर्षांत तामिळनाडूने फुटवेअर निर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. यामध्ये जियोर्जियो अरमानी आणि गुची सारखे लोकप्रिय लक्झरीयस ब्रँडचा समावेश आहे. सध्या देशात तामिळनाडूमध्ये शूज तयार करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढली आहे. कोविडनंतर चीन आणि तैवानमधून शूज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळविला आहे.