शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे हे अनेकांसाठी या क्षेत्रातील गुरु आहेत. त्यांना बिग बुल आणि अनेक उपाध्या देण्यात आलेल्या आहेत. पण बफे यांना गेल्या काही दिवसांपासून एक मोठी चिंता सतावत आहे. त्यांच्याकडे नगद, रोख रक्कमेचा डोंगर उभा ठाकला आहे. इतका पैसा जमा झाला आहे की, तो खर्चूनही कमी होत नसल्याने ते चिंतेत आहेत. त्यांच्याकडे 15 लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम आहे.
रोख रक्कमेचे भंडार
या वर्षात, 2024 च्या पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्च या तिमाहीनंतर वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हाथवेचा कॅश रिझर्व्ह वाढला. तो वाढून आता 189 दशलक्ष डॉलरवर पोहचला आहे. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 15 लाख 76 हजार कोटी रुपये होते. यापूर्वी डिसेंबर तिमाही संपण्यापूर्वी बर्कशायर हाथवेकडे 167.6 दशलक्ष डॉलर (जवळपास 14 लाख कोटी रुपये) रोख रक्कम पडून होती.
प्रत्येक तिमाहीत नवीन रेकॉर्ड
प्रत्येक तिमाहीत वॉरेन बफे यांच्या कंपनीकडे रोख रक्कमेचा आकडा वाढत गेल्याचे समोर येते. सध्या हा आकडा सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 167.6 दशलक्ष डॉलर रोख रक्कमेचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. आता मार्च तिमाहीनंतर हा आकडा वाढून 189 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक वाढला आहे.
मोठ्या भारतीय कंपन्यांच्या मूल्यापेक्षा अधिक रक्कम
भारतातील एकाच कंपनीचे मूल्य बर्कशायर हाथवेकडील रोखीपेक्षा अधिक आहे. त्यावरुन ही रक्कम किती मोठी असेल हे समोर येते. भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 19.41 लाख कोटी रुपये आहे. तर बर्कशायरचे मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या घरात आहे. तर TCS चे मार्केट कॅप 13.89 लाख कोटी रुपये आहे.
आता बफेंकडे किती संपत्ती
वॉरेन बफे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोन्हींच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, जगातील 10 सर्वात श्रीमंतात त्यांची गणना होते. फोर्ब्सच्या रिअलटाईम बिलेनिअर्स यादीनुसार, त्यांची सध्याची नेटवर्थ 131.7 दशलक्ष डॉलर आहे. ते जगातील 8 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर ब्लूमबर्ग बिलेनिअर्स यादीनुसार, वॉरेन बफे हे 132 दशलक्ष डॉलर संपत्तीसह या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत.