आज रतन टाटा अनंताच्या प्रवासाला निघाले आहेत. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांची अनेकांवर अमीट छाप आहे. ते बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. जगभरात त्यांचे अनेक चाहते आहे. इतका दिग्गज उद्योगपती पण त्यांचा साधेपणा, नम्रता, मृदुता अनेकांना प्रेरणा देऊन गेली. इतका पसारा, व्याप असताना त्यांना समाजकार्य सोडले नाही. समाजाचे ऋण ते कधी विसरले नाहीत. प्राण्याविषयी त्यांना कळवळा होता. त्यांच्यासमोर अनेक पदव्या, कितबा थिटे पडतात. त्यांच्या या प्रेरणादायी कथांनी तुमचा ऊर नक्कीच भरून येईल. आज ते आपल्यासोबत नसले तरी विचाराच्या रुपाने, त्यांच्या महान कार्याच्या रुपाने ते आज आपल्यासोबत आहेत. ते सातत्याने आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत आहेत. समाजासाठी, राष्ट्रासाठी त्यांनी अनेकदा योगदान दिले. ते रील नाही तर रिअल लाईफ हिरो आहेत. रतन टाटा यांच्या या कथा तुम्ही विसरूच शकणार नाहीत
आणि विमान आणले जमिनीवर
रतन टाटा यांच्या अगदी तरूणपणातील हा किस्सा आहे. ते तेव्हा 17 वर्षांचे होते. त्यांना वैमानिकाचा परवाना मिळाला होता. त्यांचा विमानाने हवेत झेप घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत तीन जण होते. अचानक विमानाचं इंजिन खराब झाले. पण तरीही विमानतळ 9 मील दूर असताना त्यांनी सुरक्षित विमान उतरवलं होतं. त्यानंतरही दोनदा इंजिन खराब झाल्यावर त्यांनी सेफ लँडिंग केलं होतं.
कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी विमानाकडे धाव
पुणे येथील टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश एम तेलंग यांची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तपासणी करुन तातडीने मुंबईत हलविण्यासाठी एअरलिफ्टचा सल्ला दिला होता. ऑगस्ट 2004 मध्ये हा प्रकार घडला होता. त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था झाली नाही. रतन टाटा यांना ही सर्व परिस्थिती समजली. त्यांनी तात्काळ कंपनीच्या विमानाकडे धाव घेतली. कंपनीचे विमान उडवण्याचा निर्णय त्यांनी तात्काळ घेतला. पण तोपर्यंत एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था झाली.
आजारी कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन विचारपूस
रतन टाटा यांनी आजारी कर्मचाऱ्याची घरी जाऊन विचारपूस केली. त्यांचा हा कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून आजारी होता. रतन टाटा कोणत्याही लवाजम्याविना, सुरक्षेविना पुण्यात त्या कर्मचाऱ्याच्या घरी पोहचले. त्याची विचारपूस केली. त्यावेळी याची मोठी चर्चा झाली होती.
लाडक्या कुत्र्यासाठी किंग चार्ल्सच्या अवॉर्डकडे पाठ
6 फेब्रुवारी 2018 रोजी प्रिंस चार्ल्स यांना रतन टाटा यांना किताब द्यायचा होता. त्यासाठी टाटा यांना बकिंघम पॅलेस पॅलेसचे आमंत्रण देण्यात आले. त्याच वेळी त्यांचे दोन लाडके कुत्रे टँगो आणि टिटो यांच्यापैकी एकाचा तब्येत नाजूक झाली. त्यामुळे रतन टाटा यांच्या मनाची घालमेल झाली. अखेरीस काळजीपोटी ते हा अवॉर्ड घ्यायला जाऊ शकले नाही. कुत्र्यावरील प्रेमापोटी, काळजीपोटी त्यांनी हा निर्णय घेतला.
भटक्या कुत्र्यांसाठी केले होते आवाहन
रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत एका संवेदनशील विषयाला हात घातला. आपण प्राणीमात्रांविषयी सजग राहावे, या हेतूने त्यांनी ट्विट केले. मुक्या प्राण्याविषयी आपली एक छोटी कृती त्यांना गंभीर इजेपासूनच वाचवणार नाही, तर त्यांचे प्राण पण वाचवू शकेल. प्रत्येकाने वाहन चालविण्यापूर्वी त्यांच्या चारचाकी खाली एखादा प्राणी तर नाही ना, याची खातरजमा करण्याचे आवाहन रतन टाटा यांनी केले होते.
वय ते काय असते?
रतन टाटा यांच्या नावे 8 फेब्रुवारी 2007 रोजी एक रेकॉर्ड झाला. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी बंगळुरुच्या एअरशोमध्ये मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट F-16 उडवले. या जेट फायटरचे वैमानिक पॉल हॅटेनडॉर्फ होते. रतन टाटा यांनी जे एअरक्राफ्ट उडवले होते, ते अमेरिकन नौसेनेचे विमान होते. त्याचे नाव फायटिंग फॅल्कन होते. भारताच्या रिअल लाईफ हिरोने हे फायटर प्लेन उडवले होते.