नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : देशातील आयटी सेक्टरमधील दुसरी सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (N R Narayana Murthy) त्यांच्या बेधडक विधानांनी सध्या चर्चेत आले आहे. तरुणाईने राष्ट्र उभारणीसाठी 70 तास काम करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावरुन देशात एकच गदारोळ उडाला होता. उद्योग, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रापासून तर सर्वसामान्यांनी सुद्धा त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. हा भांडवलशाही पिळवणूकीचा प्रकार असल्याची टीका झाला होती. आता त्यांनी ‘ काहीच मोफत देऊ नका’, अशी भूमिका घेतली आहे. मूर्ती यांची बाजू तरी जाणून घेऊयात. त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय?
मोफत सेवांच्या विरोधात नाही
बेंगळुरु येथील टेक समिट 2023 मध्ये त्यांनी विचार मांडले. देशात सध्या देण्यात येणाऱ्या मोफत सेवेविरोधात आपण नाही. पण सरकार देत असलेल्या मोफत सेवा आणि सबसिडी यांच्या लाभार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी योगदान दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही सेवांचा लाभ घेता. सबसिडीचा फायदा मिळवता, तर त्या मोबदल्यात तुम्ही काही तरी परत करण्यास तयार हवे. भारतासारख्या गरीब राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी दयाळू भांडवलशाहीची (Compassionate Capitalism) गरज असल्याचा पुरस्कार त्यांनी केला.
मी पण गरीब घरातील
नारायण मूर्ती यांना झिरोधाचे सहसस्थांपक निखिल कामथ यांनी फायरसाईट चॅटमध्ये काही प्रश्न विचारले. त्यात मोफत सेवांबाबत त्यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. आपण फ्री सर्व्हिसच्या विरोधात नाही. पण जे मोफत सेवांचा आणि सबसिडीचा लाभ घेत आहे. त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवण्यात गैर नाही. निदान असा लाभार्थ्यांच्या पुढील पिढ्या, त्यांचा मुलगा, नातू यांनी अधिक चांगल्या शाळांमध्ये चांगली कामगिरी बजावणे, एकूणच समाजात चांगली कामगिरी बजावणे आवश्यक असल्याचे, ही जबाबदारी उचल्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मूर्ती यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय
मूर्ती यांनी त्यांच्या या विधानामागील तर्क समोर आणला आहे. जर एखादे सरकार मोफत वीज पुरवित असेल तर अगोदर प्राथमिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती 20 टक्क्यांनी वाढवून दाखवा, तर तुम्हाला ही सेवा देऊ, असे प्रयत्न करायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुक्त बाजार आणि उद्योगीपणा या दोन खांबावर आधारीत भांडवलशाहीच कोणत्याही देशाची गरिबी संपविण्याचे एकमात्र साधन असल्याचे तर्क त्यांनी मांडला.