नवी दिल्ली : देशात महागाई सुसाट आहे. काही क्षेत्रात दिलासा असला तरी इंधन आणि इतर बऱ्याच अत्यावश्यक वस्तू महागड्या आहेत. आता या वस्तूंमध्ये आणखी एकाची भर पडणार आहे. एप्रिल महिन्यापासून तुमच्या औषधांसाठी जादा दाम मोजावे लागू शकतात. एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या किंमती (Essential medicines Price Hike) भडकणार आहेत. महागाईपासून त्रस्त गरीब आणि मध्यमवर्गाच्या खिशात आता महिन्याकाठी छदाम उरणार नाहीत, याची भीती आहे. जानेवारीपासून औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी औषध कंपन्यांनी केली होती. अनेक गोष्टी महागल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला होता. तो भरुन काढण्यासाठी कंपन्यांची ओरड होती. केंद्र सरकारने आता त्यांच्या या मागणीला मंजूरी दिली आहे.
NPPA ने दिले संकेत
या औषधांमध्ये पेनकिलर्स, ॲंटिबायोटिक, हृदय, क्षय आणि इतर अनेक रोगांवरील उपचारांच्या औषधांचा थेट संबंध आहे. दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. केंद्र सरकारने औषधी कंपन्यांना याविषयीची परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकांच्या (WPI) आधारे ही मंजूरी देण्यात येत आहे. औषधी कंपन्यांचे मूल्य ठरवणारी नियामक, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) सोमवारी याविषयीचे संकेत दिले.
एप्रिलपासून दरवाढ
राष्ट्रीय औषधी मूल्य प्राधिकरणाने (NPPA) सोमवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकांप्रमाणे, औषधी कंपन्यांना, औषधांच्या किंमतीत वाढ करता येईल. WPI, 2022 याच्या आधारे ही दरवाढ करता येईल. एप्रिल महिन्यापासून नवीन किंमतीनुसार, ग्राहकांवर बोजा पडेल. कच्चा माल, पुरवठा, वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्याने औषधी कंपन्या दरवाढीची मागणी करत होत्या.
12 टक्क्यांहून अधिकची वाढ
एका अहवालानुसीार, औषधांच्या किंमतीत 12 टक्क्यांहून अधिकची वाढ होऊ शकते. औषधांच्या किंमतीत वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. शेड्यूल ड्रग्सच्या किंमतीत जवळपास 10 टक्कांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या औषधांच्या किंमतींवर सरकारचे नियंत्रण असते. नियमानुसार दरवाढीची मागणी करण्यात येते. केंद्र सरकारच्या आदेशानंतर भावात बदल होतो. WPI मध्ये घसरण झाल्याने गेल्यावर्षी औषधांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली होती. गेल्या काही वर्षात ही दरवाढ 1% अथवा 2% दरम्यान राहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत किंमतीत अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
कंपन्यांना मोठा दिलासा
ही दरवाढ सर्वसामान्य जनतेला घोर लावणारी असली तरी, कंपन्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. फार्मास्युटिकल सेक्टरला आणि कंपन्यांना यामुळे खर्च भरून निघण्यास मदत मिळेल. गेल्या काही वर्षांत कच्चा मालात, ज्यामध्ये औषधी तयार करण्याचे सामान, मालवाहतूक, प्लास्टिक आणि पॅकेजिंगचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. आता औषधांच्या किंमती वाढल्याने कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.