Edible Oil Prices | महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या (Edible Oil) बाबतीत पुन्हा सुखद दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह द्विगुणीत करण्यासाठी तेल कंपन्या लवकरच तेलाच्या किंमती कमी करण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत घसरण होऊ शकते. अन्न आणि ग्राहक मंत्रालयासोबत (Consumer Affair) झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल प्रक्रिया आणि उत्पादकांनी तेलाच्या किंमती कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. परदेशी बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतर देशांतर्गत किंमती कमी होऊ शकतात. घसरलेल्या किमतींचा फायदा घरगुती ग्राहकांनाही (Consumer) व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच सर्वसामान्यांना स्वस्त तेल मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती आटोक्यात आल्यानंतर देशातंर्गत तेलाच्या किंमतीही कमी होतील. सरकारी बैठकीचे सोपास्कार पार पडताच याविषयीची घोषणा करण्यात येईल. यापूर्वी जुलै महिन्यात खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांची कपात करण्याची घोषणा अन्न उत्पादने (Manufacturing Company) बनवणारी कंपनी अदानी विल्मर यांनी केली होती.
रिपोर्ट्सनुसार, जागतिक बाजारात किंमती कमी झाल्यानंतर तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे दर कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. आगामी काळात खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती 10 ते 12 रुपयांनी कमी होऊ शकतात. मात्र, गेल्या महिन्यातही तेल उत्पादकांनी दर कमी केले होते. पण जागतिक किंमती घसरल्यानंतर अजूनही भावकपातीला वाव आहे, असे मंत्रालयाचे मत आहे. त्याला कंपन्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला आहे. आता किंमती 10 ते 12 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांची कपात करण्याची घोषणा अदानी विल्मरने केली होती. त्यानंतर अदानी विल्मर यांनी याविषयीचे निवदेन प्रसिद्ध केले होते. त्यात जागतिक बाजारात तेलाच्या किंमती घसरल्यानंतर कंपनीने खाद्यतेलाच्या दरात कपात केल्याचे म्हटले होते.
स्वयंपाकाच्या तेलापैकी भारत दोन तृतीयांश तेल आयात करतो. अलीकडच्या काही महिन्यांत रशिया-युक्रेन युद्ध आणि इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या होत्या. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. परिणामी जागतिक बाजारात तेलाचे दर घसरले आहेत.
दर आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी केंद्राने मे महिन्यापासून तेल उत्पादकांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत. पामतेलाच्या आयातीसाठी भारत इंडोनेशिया आणि मलेशियावर तर सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलासाठी युक्रेन, अर्जेंटिना, ब्राझील आणि रशियावर अवलंबून आहे.