नवी दिल्ली : एक वर्षापूर्वी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) मोठ्या झपाट्याने वाढत होत्या. त्याचवेळी भारताने रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाचा सौदा केला. रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल, संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची (Crude Oil Price) आयात केली होती. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत हा आकडा वाढला. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. गेल्या वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांच्या पैशांची मोठी बचत झाली आहे. आखिर बचत भी तो है कमाई! तुम्हाला त्याचा काय होईल का फायदा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचे संकेत दिले आहेत. देशात एका वर्षानंतर सार्वत्रिक निवडणुका होतील. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महागाई हा प्रमुख मुद्दा असेल. विरोधी पक्ष याबाबत म्हणावा तसा विरोध करत नसले तरी महागाईच्या चटक्यांनी मध्यमवर्ग आणि गरिब जनता चांगलीच होरपळली आहे. हा असंतोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारला इंधन दरावरील कर कपातीचा पर्याय निवडावाच लागेल.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट अर्थात डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) मध्ये 3.66 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकेन कच्चा तेलाचा भाव 77.58 डॉलर प्रति बॅरल झाला. तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) भावात 3.44 टक्क्यांची कमी आली, हा भाव 83.29 डॉलर प्रति बॅरल झाला. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.
एप्रिल-डिसेंबर या काळात रशियाकडून आयात केलेल्या कच्चा तेलाची सरासरी किंमत 99.2 डॉलर प्रति बॅरल आहे. फारतर या किंमतीत 101.2 डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यात जवळपास 2 डॉलर प्रति बॅरलची सवलत भारताला मिळत आहे. आता गेल्या वर्षापासून कमी किंमतीत कच्चे तेल आयात होत असल्याने त्याचा फायदा तेल कंपन्यांना झाला आहे. त्यामुळे देशातील जनतेला आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त मिळेल, याची तेवढी प्रतिक्षा आहे. हे वाचलेले 2 डॉलर इंधनाची स्वस्ताई आणतील का, अशी चर्चा आता रंगली आहे.