मुंबई | 29 जानेवारी 2024 : इलेक्ट्रीक बस निर्मिती करणारी भारताची आघाडीची कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअर भावात वाढ झाली आहे. कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. अलिकडे कंपनीला एसटी महामंडळाच्या ईलेक्ट्रीक शिवनेरीसह एकूण 5150 बसेसची ऑर्डर मिळाली आहे. तसेच मुंबईच्या बेस्टने देखील 2100 इलेक्ट्रीक बसेसची ऑर्डर दिली आहे. आघाडीची इलेक्ट्रिक बस आणि ट्रक उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही आणि आतापर्यंतच्या नऊ महिन्यांचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत, ऑलेक्ट्राने 178 इलेक्ट्रिक वाहने वितरित केली आहेत. 2022-23 मध्ये वितरित केलेल्या 142 वाहनांच्या तुलनेत वितरणातील ही वाढ 25 टक्के इतकी आहे.
आर्थिक वर्ष 23-24 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचा महसूल 33% ने वाढून 342.14 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने आजपर्यंत 1615 इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली आहेत. आतापर्यंत कंपनीकडे एकूण 8,088 बसेसची ऑर्डर्स कंपनीकडे आहे. कंपनीने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी 7.69 रुपये प्रति शेअर कमाई (EPS) नोंदवली आहे, 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या नऊ महिन्यात ती 4.70 रुपये इतकी होती.
आमची उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षमता वाढविण्यावर आमचे लक्ष आहे. आमच्याकडे एक चांगली ऑर्डर बुकींग देखील आहे असे या निकालांवर भाष्य करताना ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. प्रदीप यांनी म्हटले आहे. सीतारामपूर येथे 150 एकर जागेवर कंपनीच्या नव्या कारखान्याचे बांधकाम सुरू आहे आणि आम्ही फेब्रुवारी 2024 मध्ये या नवीन सुविधेतून उत्पादन सुरू करीत आहोत. या कारखान्यामुळे आमची उत्पादन क्षमता आणखी वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.