देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर बाजारात ( Share market) बिग बुल (Big Bull) या नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला ( Rakesh Jhunjhunwla) यांचा आज वाढदिवस आहे. ते 62 वर्षांचे आहेत. 5 जुलै 1960 साली जन्मलेले झुनझुनवाला हे चार्टर्ड अकाउंटंट असून गुंतवणूकदारही आहेत. फोर्ब्स बिलेनियरच्या इंडेक्सनुसार, 5.8 बिलियन डॉलर संपत्तीसह ते जगातील 438 वी श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा झुनझुनवाला असून त्यांना तीन अपत्ये आहेत. मुलीचे नाव निष्ठा तर मुलाचे नाव आर्यमान व आर्यवीर आहे. शेअर बाजारात झुनझुनवाला हे एक असे नाव आहे, ज्यांनी एखाद्या कंपनीत गुंतवणूक केल्यास इतर गुंतवणूकदार डोळे झाकून त्या कंपनीत गुंतवणूक करतात.
राकेश झुनझुनवाला यांनी 1985 साली अवघ्या 5000 रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूकीस सुरूवात केली. 1986 साली त्यांनी पहिला नफा कमावला. टाटा ग्रुपच्या अनेक शेअर्समध्ये त्यांनी गुंतवणूक केली. त्यांनी स्वत: अनेक वेळेस हे नमूद केले की 1985 साली त्यांनी टाटा टीमध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक केली. त्यांनी 43 रुपयांना हे शेअर खरेदी केले पण तीन महिन्यांतच त्याच मूल्य वाढून 143 रुपये झाले. केवळ तीन महिन्यात त्यांनी तिप्पट नफा कमावला.
कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, पण झुनझुनवाला यांची संपत्ती मात्र याच काळात तिपटीने वाढली. फोर्ब्सच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 2020 साली त्यांची संपत्ती 1.9 बिलियन डॉलर होती. 2021साली ती वाढून 4.3 बिलियन डॉलर तर आता 2022 मध्ये 5.8 बिलियन डॉलर झाली आहे.
टाटा समूह हा राकेश झुनझुनवाला यांचा आवडता आहे. टाटा समूहाच्या टायटन कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक सर्वाधिक, 9174 कोटी रुपये इतकी आहे. तर स्टार हेल्थ मध्ये 5372 कोटी, मेट्रो ब्रँड्समध्ये 2194 कोटी, टाटा मोटर्समध्ये 1606 कोटी आणि क्रिसिलमध्ये 1274 कोटी रुपये गुंतवणूक त्यांनी केली आहे.
‘बिग बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला एकेकाळी बेअर नावाने ओळखले जायचे. बेअर मार्केट म्हणजे बाजारात मंदी आणणे. झुनझुनवाला यांनी जेव्हा शेअर बाजारात पाऊल टाकले तेव्हा ते बाजारात मंदी आणून पैसे कमवत असत. 1992 साली झालेल्या कुविख्यात हर्षद मेहता स्कॅमवेळी झुनझुनवाला हे बेअर कार्टल सदस्य होते, हे त्यांनीच अनेक वेळा नमूद केले. त्यावेळी मी खूप शॉर्ट सेलिंग करायचो आणि नफा कमवायचो. 90च्या दशकात आणखी एक बेअर कार्टल होते, ज्याचे नेतृत्व मनु माणेक करत होते. त्यांना ब्लॅक कोब्रा नावानेही ओळखले जायचे. तर हर्षद मेहता हे बुल रनवर विश्वास ठेवायचे.
राकेश झुनझुनवाला यांनी एअरलाइन्सच्या उद्योगातही प्रवेश केला आहे. त्यांनी आकाश एअरमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. जुलैअखेरीस या एअरलाइनच्या उड्डाणास सुरूवात होईल. ही एक लो बजेट एअरलाइन असून ते अंतिम प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. 2023 साली आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या कंपनीचा फोकस डोमेस्टिक मार्केटमध्ये टायर-2 आणि टायर-3 शहरांवर आहे. किमान (तिकीट) किंमत आणि जास्तीत जास्त सुविधा, यावर आमचा फोकस असेल, असा दावा कंपनीने केला आहे.