नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ (Agneepath) योजना आणली आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी चाळीस हजारांपेक्षा अधिक तरुणांना सैन्यदलात (army) नोकरीची (Job) संधी मिळणार आहे. मात्र त्यांचा कार्यकाळ केवळ चार वर्ष इतकाच असेल. या योजनेला तरुणांकडून विरोध होत आहे. तरुण रस्त्यावर उतरले असून, केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. विविध राज्यांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे. याचदरम्यान अनेक रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आल्याच्या घटना देखील घटल्या आहेत. रेल्वेचे डबे जाण्यात आल्याने रेल्वे विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तरुणांनी जाळपोळ करू नये, रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करू नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. एक रेल्वेचा डबा तयार करण्यासाठी किती खर्च येते हे तुम्हाला माहित आहे का? आधी आपण एक डबा पूर्ण तयार करण्यासाठी किती खर्च येतो ते पाहुयात, म्हणजे तुम्हाला झालेल्या नुकसानाचा अंदाज येईल.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचा एक डबा एलएचबी तंत्रज्ञानाने बनवण्यासाठी कमीत कमी 40 ते 50 लाखांचा खर्च येतो. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सामानाचा समावेश नसतो. त्यानंतर या डब्यात सीट, फॅन आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे तसेच टॉयलेट बनवण्यासाठी 50 ते 70 लाखांच्या आसपास खर्च येतो. तो डबा कोणता आहे? जनरल, स्लिपर की एसी यावरून त्याची किंमत वाढत झाले. साधारणपणे एक जनलर डबा बनवण्यासाठी 80 ते 90 लाखांचा खर्च येतो, तर स्लीपर कोचचा डबा बणवण्यासाठी 1.25 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो.
एसीचा डबा तयार करायचा असेल तर खर्च आणखी वाढतो, त्यामध्ये चांगल्या दर्जाचे पडदे, काचा, सीटचा उच्च दर्जा आणि एसीचा खर्च वाढतो त्यामुळे हा खर्च जवळपास तीन कोटींच्या घरात पोहोचतो. First AC चा कोच बनवण्यासाठी खर्चात आणखी वाढ होते. तसेच रेल्वेचे एक इंजिन बनवण्यासाठी वीस कोटी रुपयांहून अधिक खर्च येतो. या सर्वांचे गणित केले तर एक रेल्वे बनवण्यासाठी अंदाजे कमीत कमी सत्तर कोटी रुपयांचा खर्च येतो.
सध्या देशभरात अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. या योजनेविरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत रेल्वेच्या 60 डब्यांसह 11 इंजीन जाळण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वेचे एकूण 700 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.