Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी, सरकार मुदतवाढ करणार?

| Updated on: Jun 30, 2023 | 4:54 PM

Pan Card Aadhar Card Linking Last Date | पॅन कार्ड-आधार कार्डसह लिंक करण्याची आज शेवटची संधी आहे. जाणून घ्या पॅन-आधार लिंकिंग कसं करायचं?

Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी, सरकार मुदतवाढ करणार?
Follow us on

मुंबई | पॅन कार्ड -आधार कार्डसह लिंक करण्यासाठी आज (30 जून) शेवटची संधी आहे. पॅन कार्डसोबत आधार कार्ड जोडण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत. पॅन-आधारसोबत लिंक न केल्यास 1 जुलैपासून तुमचा पॅन काहीच कामाचा राहणार नाही. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर अनेक प्रकारच्या सुविधा बंद होतील. पॅन कार्ड बंद झाल्याने आर्थिक व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे मोठा फटका सहन करावा लागेल. आर्थिक नुकसान होऊ शकतं. तसेच अधिक दंडही भरावा लागू शकतो. आता पॅन-आधार लिंकिंगसाठी दंडासहित 1 हजार रुपये द्यावे लागत आहेत. नंतर हीच दंडात्मक रक्कम 10 हजार रुपये इतकी होऊ शकते.

पुन्हा मुदतवाढ?

केंद्र सरकराने आतापर्यंत पॅन-आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. नागरिकांनी लवकरात लवकर पॅन-आधार लिंक करावं, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. मात्र नागरिकांनी सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे केंद्र सरकारने पॅन-आधार लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ केली. मात्र सरकारने मुदतवाढीसह पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1 हजार रुपयांचा दंड द्यायला लागणार असल्याचंही जाहीर केलं. आता लिंकिंगसाठी काहीच तास शिल्लक आहेत. त्यानंतर आता पुन्हा सरकार मुदतवाढ देणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे.

कुणाला पॅन-आधार लिंकिंग बंधनकारक नाही?

आयकर कायदा कलम 139 एएनुसार, 1 जुलै 2017 पर्यंत ज्यांच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे, त्यांना पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र यातून काही पॅन कार्ड धारकांना आधार लिंकिंग बंधनकारक करण्यात आलेलं नाही. आसाम, जम्मू-काश्मिर आणि मेघालय राज्यातील जनतेला पॅन-आधार लिंकिंग बंधनकारक नाहीये.

सोबतच ज्यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना पॅन आधार लिंकिंग करण्याची गरज नाही. तसेच अनिवासी भारतीयांना पॅन-आधार लिंकिंगतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आसाम, जम्मू-काश्मिर, मेघालय राज्यातील नागिरकांना, वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्यांना आणि अनिवासी भारतीयांना आधार-पॅन लिंकिंग करण्याची गरज नाही.

असं करा पॅन-आधार लिंक

पॅन-आधार लिंक करण्यासाठी https://www.incometaxindiaefiling.gov.in/ या वेबसाईटवर जा.

त्यानंतर क्विक लिंक टॅबमध्ये LinK Aadhar वर क्लि करा.

लिंक आधार या पेजवर तुम्हाला अचूक पॅन कार्ड आणि आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर शेवटी कॅप्चा टाकावा लागेल.

विचारण्यात आलेली माहिती अचूक भरल्यानंतर ‘Link Aadhar’ या पर्यायवर क्लिक करा.

तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य आणि अचूक असल्यास पॅन-आधार लिंक होईल.